खड्डे बुजवा अन्यथा… खड्ड्यांना अधिकार्‍यांची नावे देऊ!

0

नवी मुंबई । गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असताना नवी मुंबईतील रस्ते खड्डेमय बनले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना आपल्या लाडक्या गणरायाला खड्ड्यांतून वाट काढत आणावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावे अन्यथा या खड्ड्यांना मनपा अभियंते व कंत्राटदारांची नावे देऊ असा इशारा नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबई महानगरपालिका शहर अभियंता मोहन डगावकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

पहिल्या पावसातच रस्त्यांची झाली चाळण
गणरायाच्या स्वागतासाठी घरगुती व सार्वजनिक मंडळांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मात्र, मनपाच्या उदासीनतेमुळे नेरूळ, सीवूड्स, जुईनगर, सानपाडा, वाशी, घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली येथील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्याचा फटका बाप्पाची मूर्ती आणताना गणेश भक्तांना बसणार आहे. गॅसलाईन टाकण्यासाठी खोदलेले खड्डे बुजविण्याचे तकलादू काम केल्याने पहिल्या पावसातच तेथे पुन्हा खड्डे पडले आहेत.

निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर
अनेक कंत्राटदारांनी आवश्यकतेपेक्षा कमी जाडीचा खडीचा थर रस्त्याखाली टाकल्यामुळे सगळ्या खडी रस्त्यावर आल्या आहेत. रस्त्यांच्या डांबरीकरण व दुरुस्तीसाठी वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे होते कि काय अशी शंका येत असल्याचा आरोप मनसेचे केला आहे.

एकदा बनवले की पुन्हा कसे खड्डे पडतात?
एकदा बनविलेले रस्ते काही दिवसांमध्ये कसे खड्डेमय होतात असा प्रश्‍न मनसेने उपस्थित केला आहे. इतकेच काय आयुक्त निवासस्थानाबाहेर व शहर अभियंत्याच्या सोसायटी बाहेरील रस्त्यालाही खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्यांवरील खड्डे तत्काळ बुजवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.