शहापूर । शहापूर तालुक्यात आणि शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय असतानाही खड्डे भरण्यासाठी ठोस पाऊले उचलली जात नसल्याने सर्वच नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यातच आता खड्ड्यांतील धुळीच्या कणांमुळे दमा आणि खोकल्याचे, डोळ्याचे प्रमाण वाढीस लागल्याची ओरड होत आहे. याबाबत दाद कुणाकडे मागायची असा संतप्त सवाल तालुक्यातील जनता करीत आहे. तालुक्यातील सर्वच भागात विविध फंडातून सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद अंतर्गत मुख्य रस्ते व अंतर्गत रस्तावर शासनाने कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च केला. मात्र अल्पावधीतच या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत, तर याच जनतेला आता याच रस्त्यावरील धुळीकणांमुळे वृद्ध नागरिक, विद्यार्थी, महिला, लहान मुले, अक्षरशः बेजार झाले आहेत.
तक्रारींचा वाढला पाढा
तालुक्यातील खड्ड्यांचा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या अपर्णाताई खाडे, विद्याताई वेखंडे, सीटू संघटनेचे कॉ. विजय विशे, समाजसेवक प्रशांत गडगे आदींनी वरिष्ठ अधिकार्यांसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारींचा पाढा वाचून मांडला. मात्र अधिकार्यांनी तक्रारदाराला खोटे ठरवले. त्यातच आता धुळीमुळे होणार्या त्रासाबद्दल दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे.
प्रवाशांना दिलासा द्या!
दररोज हजारो नागरिक व शालेय विद्यार्थी प्रवास करताना वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावरील धूळ उडून प्रवाशांच्या नाका-तोंडात व डोळ्यांमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीत बिघाड होण्याची भीती आहे. याबाबत स्थानिक सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन युद्ध पातळीवर हे रस्ते पुनर्जीवीत करून धुळीपासून नागरिकांचे आरोग्य वाचवण्यासाठी ठोस प्रयत्न करून तालुक्यातील लाखो नागरिक आणि प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.