खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण

0

वासुली । काळूस-भांबोली, खालुन्ब्रे-शिवे-गडद वांद्रा, चांदूस-कोरेगाव बु., कोरेगाव खु.-महाळुंगे हे रस्ते खड्ड्यात गेले आहेत. खड्ड्यांमुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. खड्ड्यात रस्ते की, रस्त्यात खड्डे, असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्डा कुठेही आहे, हे समजत नसल्याने वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

उद्योजकांनी गटारे केली बंद
काळूस-भांबोली मार्गावर चाकण हद्दीतील झित्राई माळ, आंबेठाण गावाजवळ तसेच भांबोली हद्दीतील रस्त्याची पावसामुळे दूरवस्था झाली आहे. वाहन चालकाला रस्ता शोधत मार्गक्रमण करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असणारी गटारे उद्योजक मंडळींनी बंद केल्याने रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी पावसाचे पाणी रस्त्यावरच साचून राहत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी छोटी छोटी तळी झाल्याचे दिसते. अनेकदा पाईप लाईन, तर कधी अंडरग्राउंड वीज कनेक्शनसाठी रस्त्याची खोदाई करतात. परंतु ते खड्डे बुजविण्याचे कष्ट संबंधित विभाग घेत नसल्याने रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. बांधकाम विभाग मात्र या सर्व प्रकाराकडे डोळेझाक केली जात असल्याचे दिसून येते.

रस्त्यावरच साचते पाणी
औद्योगिकरणामुळे वासुली फाट्यावर मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. तसेच दर रविवारी येथे आठवडे बाजार भरतो. त्यामुळे येथे माणसांची व वाहनांची सतत वर्दळ असते. येथील रस्त्याला पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी गटारे नसल्याने पाणी रस्त्यावर साचून राहते. याचा परिणाम वाहतुकीवर होतो. वाहनचालकाला सावधगिरीने वाहन चालवावे लागते.

अवजड वाहतुकीमुळे रस्ता खचला
खालुन्ब्रे-शिवे-गडद वांद्रा ह रस्ता तर मृत्यूचा सापळाच आहे. खेडच्या पश्चिम भागातील वाहतुकीचा हा एकमेव मार्ग आहे. या भागात प्रचंड पाऊस पडत असतो. आधीच अरुंद असलेला रस्ता दगड खाणी व खडी मशीनच्या अवजड वाहतुकीमुळे ठिकठिकाणी खचला असून अनेक मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. याठिकाणी अनेक वाहनांचे अपघात होतात. दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने नागरीकांना जीव मुठीत धरून येथून प्रवास करावा लागतो. तर चांदूस-कोरेगाव बु., कोरेगाव खु.-महाळुंगे येथील रस्त्याची अवस्थाही बिकट आहे. इथेही खड्डे, रस्त्यात पाण्याचे डोह तयार झाल्याचे विद्रूप चित्र पाहावयास मिळते.

शासनाचे लाखो रुपये पाण्यात
हे तीनही प्रमुख जिल्हा मार्ग राज्यशासनाच्या अखत्यारीतले आहेत. एकीकडे शासन नवीन रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. तर दुसरीकडे बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे देखभाल दुरुस्तीअभावी जुन्या रस्ते खराब झाले आहेत. यातील काही रस्त्यांचे अनेकदा नूतनीकरणही करण्यात आले. परंतु बांधकाम विभागाच्या गैर व बेजबाबदारपणामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात जात आहेत.

अधिकार्‍यांची पोकळ आश्‍वासने
रस्त्यापासून 30 मीटरपर्यंत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. अतिक्रमण करणार्‍यांना बांधकाम खात्याने रीतसर नोटीसा बजावल्या असल्याचे बांधकाम विभागाचे अधिकारी पवार यांनी सांगितले. रस्त्यांची पाहणी करण्यासाठी माणूस पाठवतो, असेही त्यांनी सांगितले. परंतु अधिकारी इकडे कधी फिरकलेच नाही.

कारवाईची मागणी
खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होते. अनेक वेळा अपघात होतात. वाहनचालकांना पाठीचे, मणक्याचे आजार होतात. खराब रस्त्यामुळे गाड्याही खराब होऊ लागल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास व भुर्दंड सोसावा लागत आहे. रस्ता खराब होण्यास कारणीभूत असणार्‍या लोकांवर कारवाई करून रस्त्याची दुरवस्था थांबवावी. वरील तीनही प्रमुख जिल्हा मार्गांचे नुतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी सरपंच दत्ता मांडेकर, गणेश पवार, सुरेश पिंगळे, पं.स.सदस्य चांगदेव शिवेकर यांच्यासह नागरिकांनी केली आहे.