शिक्रापूर । शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे रोडवर पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना तारवरची कसरत करत येथून मार्गक्रमण करावा लागत आहे.
शिक्रापूर येथील चाकण चौक ते तळेगाव ढमढेरे गावापर्यंत पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली असून स्थानिक पुढारी, प्रशासन रस्ता दुरुस्तीसाठी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. हा रस्ता शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे या दोन मोठ्या गावांना जोडणारा असल्याने तसेच पुढे न्हावरे, चौफुला व सोलापूर महामार्गाला मिळत असल्याने या रस्त्यावर 24 तास वाहतूक सुरू असते. या रोड वरतीच दोन्ही गावातील महत्वाची शासकीय कार्यालये, ग्रामीण आरोग्य रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, बँका आहेत. त्यामुळे दररोज आसपासच्या 30 ते 40 गावातील नागरिकांची या रोडवरती वर्दळ असते. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करत वाहन चालवावे लागते. वयोवृद्ध व ज्येष्ठांना या रस्त्याने चालता येत नाही. कित्येकांना या रस्त्याने शारीरिक व्याधी जडल्या आहेत. परंतु प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.