खड्ड्यांमुळे शिवापूर रस्त्याची दुरवस्था

0

खेड शिवापूर- शिवापूर ते कुसगाव (ता. भोर) मार्गे वेल्हा तालुक्यात जाणार्‍या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असून, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पुणे-सातारा महामार्गाला हा रस्ता जोडला जात असून, शिवापूर ते कुसगावमार्गे कुसखिंडीतून वेल्हा तालुक्यात जात असल्याने अनेक जण या मार्गाचा वापर करीत असतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी शिवापूर गावच्या हद्दीपासून कुसगाव रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले होते; परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याने पहिल्याच पावसात खड्ड्यांतील खडी वाहून गेल्याने पुन्हा खड्डे पडले आहेत. दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यातच संबधित सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्याकडेच्या गटारांची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. हे गढूळ पाणी खड्ड्यांतून साचल्याने खड्ड्यांचा खोलीचा अंदाज येत नसल्याने दुचाकी वाहने आदळून नादुरुस्त होत आहेत. यामुळे कुसगाव आणि वेल्हा तालुक्यात जाणारे नागरिक यामुळे त्रस्त झाले असून, त्यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.