‘खड्ड्यांवरून’ चंद्रकांतदादांची कोंडी!

0

दादा क्या हुआ तुम्हारा वादा : राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

नागपूर/मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासंबंधी दिलेली 15 डिसेंबरची डेटलाईन अखेर संपली आहे. परंतु, रस्त्यांवरील खड्डे अद्याप तसेच आहेत. त्यामुळे ’दादा, क्या हुआ तेरा वादा’ अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केली गेली. येत्या 15 डिसेंबरनंतर राज्यातील रस्तामध्ये एकही खड्डा दिसणार नाही, असे आश्वासन गेल्या ऑक्टोबर महिन्यात चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले होते. यावेळी विरोधकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. यावर ’खड्डे दाखवा आणि हजार रुपये जिंका’ अशी घोषणादेखील पाटील यांनी केली होती. परंतु, अजूनही रस्त्यांवरील खड्डे बुजलेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रावादी काँग्रेससह राज्यातील विरोधकांनी पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, राज्य महामार्गांवरील खड्डे भरण्याचे काम 98 टक्के व इतर जिल्हा मार्गांवरील खड्डे भरण्याची 83 टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. विधानभवन परिसरात पत्रकारांशी केलेल्या वार्तालापात पाटील यांनी ही माहिती दिली.

राज्य मार्गावरील 98, जिल्हा मार्गांवरील 83 टक्के खड्डे बुजविले
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचा विषय आमच्या खात्याच्या अखत्यारीत येत नाही, तो केंद्र सरकारचा विषय आहे. तसेच ग्रामीण रस्त्यांचा विषयही आमच्या अखत्यारीत येत नसून तो राज्याच्या ग्रामविकास खात्याच्या अखत्यारीत येतो. ग्रामीण रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी ग्रामसडक योजना आणली असून, तिचे काम सुरू आहेच. माझ्या खात्याच्या अखत्यारीत येणार्‍या राज्य महामार्ग प्रकारातील व इतर जिल्हा मार्ग प्रकारातील रस्त्यांवरील खड्ड्यांची कामे किती झाली हे पाहण्यासाठी मी स्वतः 30 जिल्ह्यांचा दौरा केला. आमच्या विभागाने एवढी जबरदस्त मेहनत घेतल्यावरही जर काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या जनतेने तत्काळ निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी एक मोबाईल अ‍ॅपदेखील बनवण्यात आले असून, त्यावरून खड्डा बुजवण्याचे काम राहिले असल्यास फोटो पाठवून खात्याला माहिती देता येईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले. राज्यात 23 हजार किलोमीटरचे राज्य महामार्ग तर 60 हजार किलोमीटरचे इतर जिल्हा मार्ग आहेत. यापैकी राज्य महामार्गांवरील 98 टक्के खड्डे तर जिल्हा मार्गांवरील 83 टक्के खड्डे बुजले असल्याचेही चंद्रकांतदादा म्हणाले.

10 हजार किमी लांबीच्या रस्त्यांवर टोल नाही
राज्यात ‘हायब्रीड न्यूईटी मॉडेल’च्या माध्यमातून 10 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम सुरु करणार असून, त्यावर कुठेही टोल भरावा लागणार नाही, अशी घोषणाही चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. राज्यातील 53 टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना टोल बंद केला असून, मोठ्या वाहनांकडून टोल वसुली केली जात आहे. राज्यात यापुढे मोठ्या वाहनांसाठी टोल लावण्यात येणार असून, सर्व सामान्य वापरत असलेले किंवा त्यातून प्रवास करीत असलेल्या छोट्या वाहनांना टोल वसूल केला जाणार नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.