खड्ड्यात बुडून मोशीच्या दोन चिमुकलींचा मृत्यू

0

पिंपरी-चिंचवड : मोशी- बोर्‍हाडेवाडी येथील उद्यानात खेळत असताना खड्ड्यात बुडून दोन चिमुकलींचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. मृत्यू झालेली एक चिमुकली चार तर दुसरी पाच वर्षांची आहे. या घटनेमुळे मोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. पूनम अजय राजबंशी (वय 5) व प्रियांशू जोगिंदर राजबंशी (वय 4) दोघीही राहणार वाघेश्वर कॉलनी, बोर्‍हाडेवाडी, मोशी असे मृत्यू झालेल्या दोन्ही मुलींची नावे आहेत.

कामासाठी खोदलेत खड्डे
पूनम व प्रियांशू या दोघी शनिवारी सायंकाळच्या सुमारास बोर्‍हाडेवाडी येथे सरकार गायरानात असलेल्या उद्यानात खेळण्यासाठी गेलेल्या होत्या. या उद्यानात कामासाठी खड्डे खोदण्यात आलेले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. खेळता-खेळता दोघीही खड्ड्यातील पाण्यात पडल्या. त्यांना बुडून मृत्यू झाला. दरम्यान, अशीच घटना भोसरी येथील सखुबाई उद्यानामध्येही 8 जून रोजी घडली होती. यामध्ये उद्यानाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून एका नऊ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. उद्यानात खोदलेल्या खड्ड्यांवर सुरक्षाजाळी नसणे, सुरक्षारक्षकांचा अभाव, अशा बाबींमुळे उद्यानांमध्ये दुरुस्तीची कामे करताना महापालिका प्रशासन सुरक्षिततेची काळजी घेते की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.