खड्ड्याने घेतला तरूणाचा जीव

0

शिंदखेडा । तालुक्यातील अकडसे गावातल्या तापी नदीच्या पात्रात रविवारी सकाळी बुडालेला सतिषचा मृतदेह 24 तासानंतर सोमवारी सकाळी सापडला. सतिश छोटु सैंदाणे (18) हा तरूण नदीपात्रात हातपाय धुण्यासाठी गेला असता पाण्यात पाय घसरून बुडाल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. उप्परपींड तापीपात्रात वाळु ठेका असल्याने नदीपात्रात जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यात सतीशचा बुडून मृत्यु झाला. त्यामुळे जमावाने वाळु ठेक्यावरच्या जेसिबी,पोकलॅन ची तोडफोड केली. पोलिसांनी जमावाला शांत केले. रात्री उशिरापर्यंत सतीश सैंदाणेचे शव शोधण्याचे काम सुरू होते. धुळ्याहून आलेल्या सीआरएफ टिमचे प्रयत्न असफल झाल्यानंतर लोटन भोई यांनी टाकलेल्या जाळात सतिषचा मृतदेह अडकल्यावर बाहेर काढण्यात आला.

सतिश अभियांत्रिकीचा विद्यार्थी
मृत सतिश सैदांणे हा मुळचा अक्कडसे येथील रहिवासी असून तो दोंडाईचा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. त्याचे वडील छोटू सैदांणे हे दोंडाईचा येथील अ‍ॅड. एकनाथ भावसार यांचेकडे वेंडर म्हणून कामाला आहेत. त्याच्या दोन विवाहित बहिणी असून तो एकुलता एक मुलगा होता. तो तीन दिवसापुर्वीच घरी नवसाच्या कार्यक्रमाला आला होता.

वाळू माफीयांची मुजोरी
तापी पात्रातून वाळू नेण्यासाठी ठेका देण्यात आला आहे. त्यासाठी कोणत्या भागातून वाळू उपसा करावा हे ठरवून दिलेले दिले आहे. परंतू ठेकेदारांनी शासनाच्या नियमांना पायदळी तुडवून मूजोरीने संपूर्ण नदीवरच कब्जा केल्याचे दिसून येते. वाळू ठेकेदारांकडे महसूल खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे वाळू माफीयांची मुजोरी वाढली आहे. महसूल खात्याने वेळीच लक्ष नाही घातले तर ग्रामस्थ व वाळू माफीयांमध्ये मोठा संघर्ष होवून घातपाताची शक्यता नाकारता येत नाही.

माजी आमदारांकडून सांत्वन
माजी आ.रामकृष्ण पाटील यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देवून कुटूंबियांचे सांत्वन केले. गंभीर घटना घडल्याचे कोणतेही गांभीर्य महसूल विभागास नसून, महसूल विभाग आणि वाळू माफिया यांच्यात साटेलोटे असल्याच्या संतप्त प्रतिक्रीया ग्रामस्थशंनी दैनिक जनशक्तिला दिल्या. पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पो.उप निरिक्षक योगीराज जाधव, प्रकाश पोतदार हे मृतदेह शोधकार्यात ग्रामस्थांना मदत करत होते.वाळू उपसा अतिक्रमणाबाबत शिरपूर तहसिलदारांशी चर्चा करून ठेकेदारांना अटकाव केला जाईल. मृत सतिषच्या कुटूंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे शिंदखेड्याचे तहसीलदार रोहीदास वारूळे यांनी सांगितले.