गुजराल पेट्रोल पंपासमोर महामार्गावरील घटना
जळगाव – महामार्गावर जैन पाईप कंपनीजवळ ट्रॅक्टरच्या खाली येवून शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता रंवजे येथील काका पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच दुपारी दीडच्या सुमारास कापसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली खड्ड्यामुळे कारवर उलटल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेच कारचे नुकसान झाले आहे. दरम्यान चारचाकीतील चालकासह नागरिकांचा या घटनेमुळे काही क्षणासाठी काळजाचा ठेका चुकला होता. तर दुसरीकडे ट्रॉलीतील कापूस रस्त्यावर पडून ट्रॅक्टरचालकासह मालकाचेही नुकसान झाले होते.
नाशिक येथील इंदिरानगरातील रहिवासी पुरूषोत्तम हरिचंद्र करंदीकर हे कामानिमित्ताने चारचाकी (क्रमांक एमएच 15 एफएफ 3059) ने खामगाव येथे गेले होते. तेथून नाशिककडे परतत असतांना शुक्रवारी गुजराल पेट्रोलपंपासमोर शेजारुन जात असलेल्या ट्रॅक्टरची कापसाने भरलेली ट्रॉली खड्ड्यात जावून कारवर आदळली. ट्रॅक्टरची ट्रॅलीच चारचाकीवर पलटल्याने महामार्गालग असलेल्या घटना पाहणारे व चारचाकीतील करंदीकर व चालक यांचा काही क्षणासाठी काळजाचा ठोकाच चुकला. सुदैवाने कोणालाच काही झाले नसून मात्र चारचाकीचे या घटनेत नुकसान झाले.
अपघात घडल्याने रस्त्यावरील वाहतुक विस्कळीत होवून वाहनांच्या रांगा लागल्या बुल्डोझरवरील चालकाने सतर्कता दाखवित गाडीवर पडलेली ट्रॉली बाजूला करून वाहतुक सुरळीत केली. महामार्गावर पडलेला कापूस लांबपर्यंत रस्त्यावर विखुरल्याने शेतकर्यांचे नुक सान झाले. कापूस मालकाची तारांबळ उडाली होती. कापसाचे नुकसान होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस कर्मचारी कापसाच्या ठिकाणी थांबून होता. तर शेतकरी तसेच ट्रॅक्टर चालक अन्य वाहन घेण्यासाठी प्रयत्न करत होते. दुसरे वाहन आणल्यानंतर हा कापूस भरून हलविण्यात आला.