खतांसाठी शेतकर्‍याचा आत्मदहनाचा इशारा

0

रावेर (शालिक महाजन)- खरीपाच्या पिकांची चांगली वाढ व्हावी म्हणून शेतकर्‍यांची युरीयाला मोठी मागणी असलीतरी रावेर तालुक्यात नऊ हजार 140 मेट्रिक टन युरीाचा पुरवठा केल्यानंतर होलसेल विक्रेते शेतकर्‍यांना युरीया देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने शेतकर्‍यांचा मनस्ताप वाढला आहे. दुकानदारांच्या जाचाला कंटाळून शेतकर्‍यांनी आता थेट आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. झोपलेल्या कृषी विभागाने जागे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेतकर्‍यांच्या इशार्‍याने खळबळ
रावेर तालुक्यात केळीसह कपाशी, मका, ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणारवर करण्यात आली असून पिकांची वाढ चांगली व्हावी म्हणून शेतकरी पिकांना युरीया या रासायनिक खतांचा डोस देतो रंतु रावेरातील काही कृषी केंद्र चालक अल्पभूधारक शेतकर्‍यांना यूरीया देण्यास टाळाटाळ करीत असून त्यांच्याकडे युरीया उपलब्ध असतांनादेखील निव्वळ अल्पभूधारक शेतकरी आहे म्हणून त्यांची फिरवा-फिरव केली जात असल्याचा आरोप आहे. या जाचाला कंटाळुन सोमवार, 10 रोजी दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.

तालुक्याला 12 हजार मेट्रिक टन युरीयाची गरज
रावेर तालुक्याला 12 हजार मेट्रिक टन युरीया लागतो. त्यापैकी सात हजार 140 मेट्रीक टन युरीयाचा यंदाच्या खरीप हंगामात पुरवठा झाला आहे तर दोन हजार मेट्रिक टन युरीयाचा साठा एप्रिलअखेर पर्यंत कृषी दुकानांकडे शिल्लक होता. एकूण 9 हजार 140 मेट्रिक टन यूरीया तालुक्यात उपलब्ध असतांना शेतकर्‍यांची यूरीयासाठी भटकंती होत असून थेट आता शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.

यूरीयाला आहे शेतकर्‍यांची पसंती
रावेर शहरात रासायानिक खतांचा पुरवठा करणारे पाच होलसेल डीलर्स आहे. पिकांना यूरीया खताचा डोस दिल्यास चांगली वाढ होते तसेच सबसीडी कापुन यूरीयाची बॅग शेतकर्‍यांना फक्त 266 रुपयात मिळते म्हणून तालुक्यातील शेतकर्‍यांची यूरीया रासायानिक खताला पहिली पसंती असते.

तर आत्महत्या हाच पर्याय : आरीफ खान
माझ्याकडे साडेचार एकर शेती असून त्यात कपाशी केळी लागवड केली आहे. रावेरात कृषी दुकानदारांच्या गोडावूनमध्ये यूरीया उपलब्ध असतांना मला दिला जात नाही. मला आठ दिवसांपासून फिरवले जात आहे कर्ज काढून यंदा मी शेती केली आहे. मला यूरीया न मिळाल्यास माझ्याकडे आत्महत्या शिवाय पर्याय नसल्याचे शेतकरी आरीफ खान यांनी सांगितले.

यूरीयासाठी दररोज भटकंती: भागवत बारी
माझ्याकडे एक एकर स्वत:ची तर चार एकर नफ्याची शेती मी केली असून केळीसह कपाशी लागवड केली आहे. मी सुध्दा रोज सकाळ झाली की कृषी दुकानदारांकडे यूरीयाच्या शोधात फिरतो पण कोणीही देत नाही. रावेरातून बाहेर यूरीया जातो परंतु स्थानिक शेतकर्‍यांना यूरीया दिला जात नसल्याचे दुःख असल्याची भावना भागवत बारी यांनी व्यक्त केली.

कृषी विभागाने तपासणी करण्याची गरज
रावेरात यूरीया रासायनीक खताची टंचाई निर्माण झाली आहे. यूरीयाअभावी शेतकर्‍यांना थेट आत्महत्या करण्याची वेळ येत असल्यास यापेक्षा दुर्दैवी बाब कुठलीही नाही. कृषी विभाने तत्काळ स्थानिक यूरीया पुरवठा करणार्‍यांचे गोडाऊन तपासायला हवे तसेच कारवाई करायला हवी, असा सूर व्यक्त होत आहे.

विक्रेत्यांकडून खतांची लिंकिंग
यूरीयाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. अनेक दुकानांमध्ये यूरीया उपलब्ध असतांना सुध्दा अल्पभूधारक शेतकर्‍यांना दिला जात नसून मिश्रखते घेतली तरच यूरीया दिला जात आल्याचे शेतकर्‍यांमधून बोलले जात आहे. या प्रकाराला पंचायत समिती कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकार्‍यांचा वरदहस्त लाभला असल्याची चर्चा रंगली आहे.