जळगाव। पावसाला सुरुवात झाल्याने शेती लागवडीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांकडून बि-बियाणे व खतांची खरेदी सुरु आहे. दरवर्षी साठे बाजीमुळे खतांची मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्याने यावर्षी पासून प्रत्येक बि-बियाणे विक्रेत्यांकडून पीओएस मशिन देण्यात येत आहे. खते खरेदी केल्यानंतर शेतकर्यांच्या आधार क्रमांकांची पीओएस मशिनद्वारे नोंदणी केली जाणार आहे. प्रत्येक रिटेलर कृषी दुकानदारांना विविध कंपन्यांकडून मशिनचे वाटप करण्यात येत आहे. केवळ रिटेलर कृषी दुकान दारांकडेच खत खरीदीची नोंदणी केली जाणार आहे. जिल्ह्याभरातील कृषी केंद्रावर 1250 पीओएस मशिन बसविण्यात येणार असले तरी अद्यापर्यत केवळ 350-400 कृषी केंद्रावर मशिन लावण्यात आले आहे. असे असले तरी कृषी केंद्र चालकांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
30 हजार हेक्टर्सवर लागवड
पावसाला सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील पूर्व हंगामी लागवडीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील बागायतदार शेतकर्यांकडून 30 हजार 266 हेक्टरवर पूर्व हंगामील कापूस लागवड करण्यात आलेली आहे. जिल्ह्याभरात 8 टक्के लागवड झाली आहे. जिल्ह्यात 16 लाख बीटी कापूस बियाण्याच्या पाकिटांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. जिल्ह्याभरात एकुण 4 लाख 68 हजार 800 हेक्टरवर लागवड करण्यात येणार आहे. पावसाचे आगमन झाल्याने बियाणे खरेदीसाठी शेतकर्यांनी गर्दी केली आहे. बोगस बियाण्यापासून सावधान राहण्याचा इशारा कृषी विभागकडून देण्यात आला आहे.