खरगे, मोदी आणि हाथरसी!

0

अंतरपट में खोजिए छिपा हुआ है खोट
मिल जाएगी आपको बिल्कुल सत्य रिपोर्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना काका हाथरसी यांची कविता सादर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार-आचार पटो न पटो. मात्र, एक नेता म्हणून त्यांचे महत्त्वकोणीही नाकारू शकत नाहीत. एक वक्ता म्हणूनही ते लोकांना भावणारेच बोलतात, हेही मान्य करावेच लागेल.

संसदेतील ताज्या भाषणातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तृत्वाच्या बळावर आपले नेतृत्व आणि कर्तृत्व मांडताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रभावी भाषणावर मात केली. त्यात शेवटी वापरलेली काका हाथरसींची कविता हा कळस होता. सातत्याने सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला पुन्हा एकदा अपराधबोधग्रस्त करण्याचा मोदींचा प्रयत्न या ओळींमुळे अधिक ठसठशीतपणे दिसून आला.

विरोधीपक्षनेत्यांचे भाषणही काही कमी नव्हते. खरगे हे ज्येष्ठ नेते. त्यांनी केलेले भाषण हे त्यांच्या पदाला साजेसे. अभ्यासपूर्ण, आक्रमक. सत्ताधारी पक्षाची पिसे काढणारे. त्यांनी थेट हल्ला केला. सरकारला विचारले, तुम्हीच देशभक्तीचा ठेका घेतला आहे का? तुम्ही देशाला धार्मिक आधारावर वाटत आहात. त्यांचा पुढचा वार तर तर लागणाराच. सामान्यांना पटणाराही. ते म्हणाले, देशाच्या एकतेसाठी गांधीजी, इंदिराजींनी प्राणाचे बलिदान केले. तुमच्या घरांमधून कोण आले होते? एक कुत्राही आला नाही. तुम्ही लोकांना भावनात्मक ब्लॅकमेल करता. सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावर संपूर्ण देश सैन्यासोबत आहे, एकटे तुम्ही नाही, असे बजावत खरगे यांनी सरकारच्या देशभक्ती एकाधिकाराचे वाभाडे काढले.
खरेतर काँग्रेसच्या नेत्यांकडून एवढे आक्रमक भाषण क्वचितच ऐकायला मिळते. मात्र, खरगे हे तसे अभ्यास करून चांगले बोलतात. आक्रमक असतात. काल त्यांनी तर कळसच चढवला.

विरोधी पक्षनेत्यांच्या आक्रमक भाषणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय बोलतात, कसे उत्तर देतात, त्याविषयी स्वाभाविकच उत्सुकता निर्माण झाली होती. आधीच म्हटले तसे ते चांगले वक्ते आहेतच. पण त्याचबरोबर प्रतिकूलतेला अनुकूलतेत बदलण्याचे चातुर्य असलेले कसलेले नेतेही आहेत हे पुन्हा दिसून आले.
काँग्रेसच्या आक्रमकतेला मुँहतोड उत्तर देतानाच त्यांनी हास्यरसाचाही खुबीने वापर केला. तुम्ही ज्या मुद्द्यांवर आम्हाला घेरू पाहता त्याच मुद्द्यांना तुमच्यावर उलटवतो, या आवेशातील त्यांचे भाषण डाव पुन्हा ताब्यात घेणारेही होते.

आपल्याला निवडणुकांची नाही तर देशाची चिंता असल्याचे सांगत त्यांनी नोटाबंदी ही अर्थव्यवस्था चांगली असताना जाणीवपूर्वकच केली. रुग्ण चांगला असतानाच डॉक्टर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतात, हे सांगत थेट लोकसभेतील खासदारांसमोरच्या भाषणाला लोकांच्या मनापर्यंत पोहोचवले.
विरोधकांच्या नोटाबंदीविरोधाला पाखंडी ठरवत त्यांनी चार्वाकाची आठवण करून दिली. ते म्हणाले, काहींच्या डोक्यात चार्वाकचा मंत्र आहे. जगा, मजा करा, चिंता कशाला?

स्वत:वर होणार्‍या लोकशाहीविरोधी असल्याच्या आरोपालाही त्यांनी काँग्रेसवर उलटवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, तुमच्या पार्टीची लोकशाही लोकांना माहीत आहे. एका कुटुंबाभोवती सत्ता केंद्रित आहे. 1975मध्ये तुम्हीच संपूर्ण देशाचा तुरुंग केलात. जयप्रकाश नारायणांसोबत लाखो भारतीयांना गजाआड टाकलेत. वृत्तपत्रांच्या कार्यालयांना टाळे लावलेत. जनशक्तीच्या बळावर लोकशाही पुन्हा प्रस्थापित झाली. त्याच शक्तीमुळे गरीब घरातील मुलगा पंतप्रधान झाला. भाजपने काय केले. घरातील कुत्राही स्वातंत्र्यलढ्यात नव्हता. याचे खंडन करताना नरेंद्र मोदींना चांगल्याप्रकारे माहीत असावे की स्वातंत्र्य चळवळीतील दाखले देणे तेवढे प्रभावी ठरणार नाही. ते थेट मागे गेले. मागे म्हणजे अगदी 1857च्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात. त्यावेळी तुमच्या पक्षाचा जन्मही झाला नव्हता असे ठणकावताना ते म्हणाले, त्यावेळीही कमळ होते आणि आताही कमळ आहे!

नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या मर्मस्थळाला लक्ष्य केले. राहुल गांधी यांनी म्हटले होते, मी जर बोललो तर भूकंप होईल. तो धागा पकडत ते म्हणाले, काल भूकंप आला. केंद्र सरकार राज्याला मदत करेल. अखेर भूकंप आला. मात्र, धमकी तर अगोदरच ऐकली होती. काहीतरी कारण असेल धरतीमाता नाराज झाली असेल. राहुल गांधींसाठीचा हा टोमणा काँग्रेसला चवताळवणाराच. झालेही तसेच. गदारोळ झाला. काँग्रेसवाल्यांना चिथवण्याचा, अस्वस्थ करण्याचा मोदींचा हेतू सफल झाला.

गेल्या दोन दिवसांत लोकसभेत दोन चांगली भाषणे ऐकायला मिळाली. मात्र, भाषणांनी पोट भरत नसते. सामान्यांना बोलणारे नको तर करणारे भावतात. कारण भाषण नाही तर राशन महत्त्वाचे. चांगले बोलणारे मल्लिकार्जुन खरगे असो वा सदाबहार वक्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असो या सार्‍यांनीच आता एक किमान समान कार्यक्रम ठरवावा. फक्त आणि फक्त जनहिताचा. कृतीची जोड असलेला. नाहीतर वैतागलेल्या सामान्य भारतीयांची स्थिती मोदी यांनी ज्या काका हाथरसींच्या ओळी वापरल्या त्यांच्याच पुढील ओळींसारखी नेहमीच असते,
राशन की दुकान पर, देख भयंकर भीर
‘क्यू’ में धक्का मारकर, पहुँच गये बलवीर
पहुँच गये बलवीर, ले लिया नंबर पहिला
खड़े रह गये निर्बल, बूढ़े, बच्चे, महिला
कहँ ‘काका’ कवि, करके बंद धरम का काँटा
लाला बोले – भागो, खत्म हो गया आटा
किमान आता तरी ही स्थिती बदलावी, खरोखरच ‘अच्छे दिन’ यावेत.