खरजई खुनाने हादरले : मारहाणीचा जाब विचारल्याने तरुणाची हत्या ; आरोपीला अटक

भुसावळ/चाळीसगाव : मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर झालेल्या बाचाबाचीत तरुणाच्या पोटात चाकूचे सपासप वार करण्यात आल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील खरजई येथे बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सतीश साहेबराव सोनवणे (32, बेघरवस्ती, खरजई) या तरुणाचा मृत्यू झाला तर या प्रकरणी प्रवीण उर्फ मोन्या राजू सोनवणे (ह.मु.बायपासरोड, चाळीसगाव) यास पोलिसांनी अटक केली आहे. चाळीसगाव शहर पोलिसात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मारहाणीचा जाब विचारल्याने वाढला वाद
गेल्या काही दिवसांपूर्वी खरजई गावातीलच संशयीत प्रवीण उर्फ मोन्या राजू सोनवणे (ह.मु.बायपासरोड, चाळीसगाव) याने खरजई गावातील पिंटू शिंदे या तरुणास मारहाण केली होती. त्यास मारहाण का केली याची विचारणा करण्यासाठी सतीश साहेबराव सोनवणे (32, बेघरवस्ती, खरजई) हा बुधवारी रात्री आला असता उभयंतांमध्ये शाब्दीक वाद वाढला व त्यानंतर प्रवीण शिविगाळ करीत असताना सतीश यांच्या पत्नीने शिविगाळ का करतो ? अशी विचारणा करताच प्रवीणने विवाहितेच्या कानशीलात लगावली व त्यामुळे वाद अधिकच वाढला. यावेळी संशयीत आरोपी प्रवीणने खिशातील चाकू काढून सतीशच्या पोटात दोन ते तीन वेळा खुपवल्याने सतीश हा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला व संशयीत प्रवीण लागलीच तेथून पसार झाला. अत्यवस्थ अवस्थेतील सतीश यास चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.

आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा
सतीश सोनवणे याचा खून केल्याप्रकरणी मयताचा भाऊ भाऊ संजय साहेबराव सोनवणे याने चाळीसगाव शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी प्रवीण उर्फ मोन्या राजू सोनवणे (ह.मु.बायपासरोड, चाळीसगाव) विरोधात गुरनं.117/2022 कलम 302, 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, शहरचे पोलिस निरीक्षक के.के.पाटील व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली.