खरवड येथे जिओ टॉवर धूळखात पडून

नेटवर्क नसल्याने नागरिक त्रस्त

 

बोरद। तळोदा तालुक्यातील खरवड येथे जिओ या खासगी कंपनीचे टॉवर उभे करण्याचे काम दोन वर्षापूर्वी केले होते. मात्र, मागील दोन वर्षांपासून नुसता मनोरा उभा केला आहे. तो आता धूळखात पडून आहे. जिओ या खासगी कंपनीचे ग्राहक परिसरात मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, नेटवर्क नसल्याने नागरिकांना महत्वाच्या संभाषणासाठी अडचणी निर्माण होत आहे. संभाषण तसेच नेट वापरण्यासाठी गावाच्या बाहेर जावे लागत असल्याचे चित्र आहे. टॉवर उभे करून अनेक दिवस झाले आहे. याकडे संबंधित कंपनीचे कोणतेही अधिकारी फिरकलेच नाही. त्यामुळे नुसता मनोरा उभा करूनच मोकळे सोडले आहे. हे टॉवर कधी सुरू होणार? तसेच नेमके घोडे कुठे अडले आहे? असे प्रश्‍न ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. टॉवर सुरू झाल्याने नेटवर्कची समस्या सुटणार आहे. त्यामुळे नागरिकांना सोयीचे होणार आहे.

आधुनिक युगात मोबाईल फोन ही मानवाची चौथी गरज आहे. बहुतांश कामही ऑनलाईन झाल्यामुळे मोबाईलद्वारे अनेक काम घर बसल्या करता येत असतात. जिओने रिचार्ज दर वाढविले आहे. तरीही मात्र ग्राहक त्याला पसंती देत आहेत. संबंधित कंपनीने याकडे लक्ष देवून टॉवर सुरू करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.