खराडीतील वीज ग्राहकांचे प्रश्‍न मार्गी लावणार : पालखे

0

40 ते 45 हजार वीज ग्राहक असल्याने प्रश्‍न सोडविण्याचे वीज मंडळासमोर मोठे आव्हान

येरवडा – खराडी-चंदननगर भागात खासगी कंपन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. तसेच परिसरात बांधकाम व्यावसायिकांनी टोलेजंग इमारती उभारल्याने वीज वापर वाढला आहे. याचा परिणाम म्हणून खराडी भागात जवळपास 40 ते 45 हजार वीज ग्राहक असल्याने त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे एक प्रकारचे मोठे आव्हान होते. मात्र परिसराचा व्यवस्थितपणे अभ्यास करून नागरिकांचे कशा पद्धतीने सोडविता येईल, याकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचे सहाय्यक अभियंता राहुल पालखे यांनी सांगितले.

चंदननगर-खराडी भागात वारंवार वीज पुरवठा खंडीत होणे तसेच वाढीव दराने वीजबिले आणि मीटर जोडणीसाठी लागणार विलंब असे ग्राहकांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित असून त्यासंदर्भात जनशक्तिच्या प्रतिनिधीशी बोलताना पालखे यांनी तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले.

वीज मीटर न काढता नोटिसद्वारे समज
खराडीत बहुतांश भागात उच्चभ्रू सोसायट्या असल्याने येथील उपकेंद्रात ग्राहक वीजभरणा वेळेत करत असले तरी काही प्रमाणात वेळेवर वीज बिलांचा भरणा न करणारे ग्राहकही असल्याचे सांगताना पालखे म्हणाले, वीज बील वेळेवर न भरणार्‍या अशा ग्राहकांचे वीज मीटर न काढता त्यांना नोटीस देऊन प्रथम त्यांना समज देण्यात येते. एखाद्या ग्राहकाने वीज बील भरण्यास टाळाटाळ केली तरच अशा ग्राहकांचे वीज मीटर कर्मचारी काढून टाकतात. मात्र आजपर्यंत अशी कोणती अडचण आली नाही. काही वीज ग्राहकांना अधिक वीजबील आले, तर ते कर्मचार्‍यांशी संपर्क साधतात. कर्मचारी त्यांच्या पातळीवर प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याशी बिलाबाबत चर्चा करून प्रश्‍न मार्गी लावण्याचे काम केले जाते.

ग्राहक सेवेला प्राधान्य
परिसर मोठा असल्याने काही वेळेस काही भागाचा वीजपुरवठा खंडीत झाल्यास तात्काळ कर्मचारी अशा भागात जाऊन सुरळीतपणे तो सुरू करण्याचे काम करतात. त्यातच वरिष्ठ अधिकार्‍यांनी बैठक बोलाविल्यास संबंधित भागात काय अडचण असेल तर यासंदर्भात देखील तात्काळ अधिकार्‍याकडे याबाबत तक्रार करून वरिष्ठ अधिकारीही मुख्य समस्या लक्षात घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे ग्राहकसेवेला प्राधान्य देऊन त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम आपले असल्यामुळे ग्राहकांचे प्रश्‍न सोडविण्यास आपण यापुढे देखील वचनबद्ध राहण्याचा विश्‍वास पालखे यांनी व्यक्त केला.