भुसावळ – जुना सातार्यात खराब रस्त्यामुळे बुधवारी अपघात होवून वेदांत दिवेकर या युवकाचा बळी गेल्याने या प्रकाराला दोषी समजून भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे व मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस.यु.कुरेशी यांच्यावर सदोष मनोष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी गुरुवारी प्रांताधिकारी प्रशासनाकडे केल्याने शहराच्या राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली. तीन महिन्यात शहराचा कायापालट करून विकासाची स्वप्ने दाखवणार्या सत्ताधार्यांनी वर्षभरानंतरही प्रत्यक्षात कुठलीच ठोस कृती केलेली नाही. केवळ मलिदा लाटण्याचे काम नगराध्यक्षांनी सुरू केल्याचा आरोपही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. जनआधारचे गटनेता उल्हास पगारे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
शेख सलीम शेख नादर पिंजारी, सिकंदर खान, जाहेराबी शेख शब्बीर, रवींद्र बळीराम सपकाळे, राहुल कैलास बोरसे, सचिन भास्कर पाटील, दीपक बाबूराव दीपके, दशरथ जाधव, सिद्धार्थ मोरे, किरण तायडे, शरद दाभाडे, निनाजी नरवाडे, अनिल बाविस्कर, विजय मोरे, आनंद चौथमल, संगीत खरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.
अपघातानंतर कृती नव्हे, आधीपासून पाठपुरावा
अपघाताची घटना निश्चितच दुर्दैवी आहे. जुना सातारा भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामासंदर्भात वर्कऑर्डर बुधवारीच काढण्यात आली असून एक वा दोन दिवसात खड्डे बुजवण्यास सुरुवात होईल, असे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले. अपघातानंतर आम्ही खड्डे बुजवण्याबाबत दखल घेतलेली नाही तर आधीपासून पाठपुरावा आमचा सुरू असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.