खराब रस्त्यामुळे गॅसचा टँकर उलटला

0

शिक्रापूर । खराब रस्त्यामुळे पिंपळे जगताप-सणसवाडी रोडवरील भारत गॅस कंपनीकडे जाणारा टँकर रस्त्याच्या मधोमधच उलटला. सुदैवाने गॅसगळती झाली नाही. त्याचवेळी तेथून जाणारे मानवी हक्क आयोगाचे प्रदीप बेंडभर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वेळीच दखल घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. या रोडवरती लहान मोठ्या कंपन्या तसेच भारत गॅसचा रिफलिंगचा मोठा प्लांट आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच गाड्यांची वर्दळ असते. तसेच हा मार्ग चाकणवरून नगर हायवेला येण्यासाठीसुद्धा सोयीस्कर आहे. त्यामुळे प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. हा टँकर भारत गॅस मधून गॅस भरून चाकणला चालला होता. पण खड्डा चुकवायचा नादात त्याची पुढील बाजू वेगळी झाली व टँकर उलटा झाला. आजूबाजूला लोकवस्ती तसेच इंजिनीअरीं कॉलेज असल्याने माणसांची वर्दळही खूप होती. बेंडभर यांनी भारत गॅस प्रशासनाला वेळीच याची माहिती दिली तसेच वाहतूक सुरळीत होण्यास मदत केली.

हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी सरकारी दरबारी निवेदन दिलेले आहे. भारतगॅसच्या कंपनी प्रशासनाकडेही वेळोवेळी रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. परंतु सर्वांनीच याकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच आजची ही घटना घडली आहे. रस्ता दुरुस्तीची दखल न घेतल्यास यापुढे भारत गॅस कंपनीकडे जाणार्‍या गाड्या अडवण्यात येतील व याविरुद्ध आंदोलन छेडण्यात येईल, असे बेंडभर यांनी यावेळी सांगितले.