जळगाव : हवामानशास्त्र विभागाने या वर्षी पावसाचे वेळेवर आगमन होईल, असा अंदाज वर्तविला असला तरी जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात त्याची प्रतीक्षा करावी लागली असल्याने पावसाबाबत जिल्ह्याभरात संभ्रम निर्माण झाला आहे. मागील आठवडयात जळगावसह परिसरात पाऊस झाला, बहुतांश ग्रामीण भाग कोरडा राहिला असून पावसाने दांडी मारल्याने 80 टक्के क्षेत्रावरील झालेल्या पेरणी अडचणीत आहे. गेल्या तब्बल 20 दिवसानंतर पावसाचे आगमन झालेले असून येत्या काही दिवसात जिल्हा पाण्याखाली येणार असल्याचे संकेत जाणकारांनी दिले आहे. मात्र पावसाअभावी सद्यस्थिती शेतकर्यांची वाईट असून दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
दुबार पेरणीमुळे आर्थिक संकट ?
आर्थिक संकट ठाकले असून दुबार पेरणीसाठी पैसे नसल्याने तसेच पहिल्याच पेरणीसाठी कर्जाची रक्कम खर्च झाल्याने त्यांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे बिघडले आहे. जाणकार शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार आषाढि एकादशीलाच पाऊस येणार असल्याचे भाकीत आहे. या सर्व संकटाचा परिणाम बाजार पेठेतील व्यवहारावर झाल्याने तेथेही शुकशुकाट दिसत आहे. शेती मशागतीच्या कामांना ब्रेक लागल्यामुळे मजूर वर्गालाही पोटापाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. तर दुबार पेरणीसाठी आवश्यक बियाणे बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने अव्वाच्या सव्वा दराने काही बियाणे विक्रेते बियाणे विकत आहे. तसेच खताचीही टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अद्याप काही भाग कोरडा
ग्रामीण भागातील अमळनेर, चोपडा, रावेर, भुसावळ, यावल, पारोळा, शेदुर्णी, पाचोरा, चाळीसगाव याभागात दिलासादायक प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकर्या मध्ये समाधान आहे. मात्र इतरत्र भागात अद्याप पर्यत पावसाने दांडी मारल्याने दुष्काळग्रस्त स्थिती जळगाव ग्रामीण तसेच जिल्ह्यात निर्माण झाली आहे. चोपडा, पारोळा तालुक्यांत रिमझिम स्वरुपात एकून 5 तास पाउस झाल्याने महामार्गावर पाणी झाले होते. तालुक्यासह सकाळपासून सुरू झालेला पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत कायम होता. संततधार सुरू असल्याने पेरणीसाठी तो लाभदायक ठरणार असल्याचे चित्र आहे.
नव्याने लागवड करावी लागणार
मृग नक्षत्रात जोरदार पाऊस झाल्या मुळे येथील शेतक-यांनी पेरणीला सुरुवात केलीहोती मात्र पेरणी नंतर हल्क्या फुलक्या पावसावर जमिनीतून अंकुर बाहेर आले. मात्र गेल्या काही दिवसा पासुन पावसाने येथील बहुतांश भागातून दांडी मारल्याने ही बारीक़ बारीक़ पिके कोमजु लागली असल्याचे चित्र येथे दिसुन येत असल्याने शेतकरी हवालदील झालेला दिसुन येत आहे. ज्या शेतक-यांनी धूळ पेरणी केली होती. त्यातील काही शेतकर्यांना पेरणी नंतरच्या अती जोरदार पावसा मुळे बियाने दबले गेल्याने बहुतांश शेतक-यांना काही प्रमाणात बियाची नव्याने लागवड करावी लागली होती.
पिकांना मिळू शकते जीवनदान
गेल्या काही दिवसापासून दांडी मारलेल्या पावसाने दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. या पिकांना जीवदान मिळणार आहे. उर्वरित क्षेत्रावरील रखडलेली पेरणीची कामे मार्गी लागण्यास या पावसाने हातभार लागणार आहे. काही भागांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले.
शेंदुर्णी परिसर कोरडाच
शेंदुर्णी व परिसरात 2 आणि 5 जून 17 रोजी जोरदारपणे पावसाचे आगमन झाले होते. काही दिवस सतत ढगाळ वातावरण होते. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांना वातावरण खरिपाच्या पेरणीस योग्य वाटले. परिसरातील जवळपास 80% शेतकर्यांनी जमिनीवर कापूस, मका,सोयाबीन व कडधान्य पिकाची लागवड केली होती. 9 जूनला तुरळक पाऊस पडल्यामुळे 70% शेतात पिके उगवली नाही. उगलेली 30% पिके पावसाच्या ताणामुळे कोमजून गेली. तर 20% क्षेत्रातील ठिबकद्वारे पाणी पुरवठा करून उगवलेली कपाशीचे वाढीवर पाऊस नसल्याने परिणाम झाला आहे.
पेरण्या धोक्यात
लोहारा येथे नव्याने लागवड केलेल्या पिकाला पावसाअभावी धोका निर्माण झालेला आहे .ज्या शेतक-यांनी ठिबक वर कापसाची लागवड केली आहे. त्यांचेही साठवण केलेल्या विहिरीतील पाण्याची पातळी गाठल्याने भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीला येथील शेतक-याला जोरदार पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे. जर अजुन काही दिवस पावसाने दांडी मारली तर येथे खरीपाची पेरणी धोक्यात येणार आहे.