२ मे रोजी राज्यस्तरीय खरीप आढावा बैठक
मुंबई : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी येत्या २ मे २०१८ चा मुहूर्त निवडला आहे. बुधवारी राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील रंगशारदा सभागृहामध्ये ही बैठक होणार आहे.
हे देखील वाचा
हवामान विभागाने यंदाच्या वर्षी देशभरात चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यापार्श्वभूमीवर खरीपाच्या तयारीत कुठेही कसूर ठेवायची नाही असा चंग सरकारने बांधला आहे. बैठकीसाठी सुमारे चारशे मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. कृषि, सहकारसह विविध विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त, विभागीय कृषि आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समित्यांमधील कृषि समितीचे अध्यक्ष आदींना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
कृषि खात्याचे राज्यभरातील उच्चपदस्थ अधिकारीही यावेळी उपस्थित असणार आहेत. त्याशिवाय सहकार विभागाचे उच्चपदस्थही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नाबार्ड, बँक ऑफ महाराष्ट्र तसेच इतर बँकांचे पदाधिकारीही बैठकीला येतील. खरीपाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस स्वतः यंत्रणेला मार्गदर्शन करणार आहेत. कृषि खात्याला सरकारी यंत्रणेला प्रोत्साहित करण्याचे काम यावेळी केले जाणार आहे. शेतकऱ्यांना विशेषतः खते, बि-बियाणे पुरेशा प्रमाणात आणि वेळेवर पुरवठा करण्यासाठी मोहीम राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना खरीपासाठी पतपुरवठा महत्वाचा असतो. यासंदर्भातही धोरण निश्चित केले जाणार असल्याचे कृषि खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीचे आयोजन प्रत्येक वर्षी मंत्रालयाशेजारील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये केले जाते. यावेळी प्रतिष्ठानचे सभागृह इतर कार्यक्रमासाठी आगाऊ नोंदणी झालेले असल्याने बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.