तळेगाव दाभाडे : सततच्या मुसळधार पावसाने यावर्षी मावळ तालुक्यातील खरीप भात पिकाचे, शासनाने ठरविलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झालेले असून भाताचे पिक पहिल्या टप्प्यात अतिशय चांगले असल्याचे मावळ तालुका कृषी अधिकारी विनायक कोथिंबरे यांनी सांगितले. यंदा मान्सूनच्या पावसाने एक जून पासूनच तालुक्यात चांगली सुरुवात केली होती. मृग नक्षत्राच्या चांगल्या वाफेवर खरीप भात उत्पादक शेतकर्यांनी रोपांच्या पेरण्या वेळेवर केल्या होत्या. पेरण्या नंतरची उगवण ही चांगली झाली होती. त्यानंतर पावसाने मात्र थोडा ताण दिला होता.
पावसाने सरासरी ओलांडली
गेले तीन आठवडे मावळात मान्सूनचा जोरदार पाऊस तालुक्याच्या सर्व विभागात पडत असून पावसाने मागील वर्षातील जुन, जुलै महिन्याची सरासरी ओलांडली आहे. हा पाऊस काही विभागात मुसळधार तर काही भागात संततधार पडत आहे. त्यामुळे भात खासरे पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. मावळ तालुका हा खरीप भात पिकाचा प्रमुख असून राज्यशासनाच्या कृषी विभागाने यावर्षी 9 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर भात पिक घेण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र चांगल्या पावसामुळे यावर्षी सर्वच विभागातील भात पिकाच्या लागवडी शंभर टक्के पूर्ण झालेल्या असून यावर्षी उद्दिष्टापेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड झाली असे कृषी अधिकारी कोथिंबरे यांनी सांगितले. यावर्षी मावळातील शेतकर्यांनी इंद्रायणी भात पिकाला अधिक पसंदी दिली असून चांगल्या पावसामुळे वेळेत भात लागवडी झाल्याने शेतकरी परिवार समाधानी आहेत.