शिंदखेडा। शेतकर्यांना खरीप हंगामासाठी तातडीने दहा हजार रुपयाचे कर्ज देण्याचे आदेश दिल्यानंतरही शेतकर्यांना पैसे मिळत नसल्याची तक्रार शेतकर्यांनी केल्याने शिंदखेडा तालुका काँग्रेसच्यावतीने स्टेट बँकेसमोर निदर्शने करीत कर्जवाटप झालेल्या शेतकर्यांच्या नावाची यादी मागण्यात आली.
तातडीने 10 हजार देण्याचे निर्देश
शासनाने 14 जून व 20 जून 2017 रोजी परिपत्रक काढून 30 जून 2016 अखेर थकबाकीदार असलेल्या शेतकर्यांना खरीप पिकासाठी दहा हजार रुपयेपर्यंत तातडीने कर्ज देण्याचे निर्देश दिले होते. जिल्हा बँकेसह सहकारी बँका व व्यापारी बँकांनाही कर्ज उपलब्ध करुन देण्यास सांगण्यात आले होते. मात्र शिंदखेडा येथील स्टेट बँक शाखेतून शेतकर्यांना कर्जच मिळत नसल्याची तक्रार झाल्याने काँग्रेसने आंदोलनाचा पावित्रा घेत बँकेने वितरीत केलेल्या कर्जाची माहिती तसेच कर्ज वितरणासंबंधी आरबीआय किंवा नाबार्डने काही सूचना केल्या असतील तर त्याची माहिती द्यावी, अशी मागणी केली.