कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबई : खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडे बियाणं आणि खतांची कोणतीही कमतरता नाही. शेतकऱ्यांना गरजेनुसार त्याची पुर्तता केली जाईल, अशी माहिती कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पीक विम्यासाठी नोंदणी सुरु झाली असून, शेतकऱ्यांनी त्याचा वेळेत लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी श्री. पाटील यांनी केले. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजय कुमार तसेच कृषी विभागाचे अन्य अधिकाऱ्यांसोबत खरीप हंगामासंदर्भात आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा पाटील यांनी घेतला.
पीक विमा नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून, शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपलं सरकार’ केंद्रामार्फत, किंवा कर्ज घेतलेल्या बँकांमार्फत 24 जुलैपर्यंत पीक विम्यासाठी अर्ज करावा, असे आवाहनही पाटील यांनी केले. दरम्यान, शेतकऱ्यांनी पावसाचा अजूक अंदाज व जमिनीचा ओलावा विचारात घेऊनच पेरणीची प्रक्रिया सुरु करावी. तसेच, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आंतरपिके घेण्याला प्राधान्य द्यावे. शिवाय, खते आणि किटकनाशकांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा अशा सूचनाही पाटील यांनी यावेळी केल्या.