खरेदीवर डिस्काउंट न दिल्याने यूपीत दोन जणांची हत्या

0

लखनौ- खरेदी केलेल्या कपड्यांवर सवलत न दिल्यामुळे एका व्यक्तीने मॉलमधील दोन सेल्समनची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील जेएचव्ही मॉलमध्ये घडली.

जेएचव्ही मॉलमधील एका कपड्या्च्या दुकानात सामानाची विक्री करणारा सेल्समन आणि खरेदी करण्यासाठी आलेल्या दोघांमध्ये डिस्काउंट न दिल्यामुळे वाद झाला. थोड्याच वेळात हा वाद शिगेला पोहोचला आणि दोघांपैकी एका व्यक्तीने बंदूक काढली आणि दोन जणांवर गोळीबार केला, यामध्ये अन्य दोघंही जखमी झाले. मृतांची ओळख पटली असून सुनील आणि गोपी अशी त्यांची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर गोलू आणि विशाल हे दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मॉलमध्ये ऐन गर्दीच्या वेळी ही घटना झाल्याने एकच दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे दुकानं लवकरच बंद करण्यात आली आणि मॉल रिकामा करण्यात आला. या घटनेत अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. मात्र, सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेतला जाईल, तसंच त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांकडूनही माहिती गोळा केली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.