समान पाणीपुरवठा योजना पालिकेच्या अंगलट; कर्जरोख्यांसाठी गेल्या दीड वर्षांत मोजले पाचपट व्याज
पुणे : समान पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल 200 कोटींचे कर्जरोखे घेत थेट दिल्ली दरबारी पुरस्कार मिळविणार्या महापालिकेने या कर्जरोख्यातील अवघे 5 कोटी खर्च केले आहेत. तर या कर्जरोख्यांवर गेल्या दीड वर्षांत पालिकेने तब्बल 22 कोटींचे व्याज मोजल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कर्ज काढण्याची घाई महापालिकेस चांगलीच महागात पडत असल्याचे चित्र आहे. महापालिकेने तब्बल अडीच हजार कोटींची समान पाणीपुरवठा योजना राबविण्याचे ठरविले आहे. यासाठी पालिकेने 1 हजार कोटींचे कर्जरोखे उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात जून 2017 मध्ये तब्बल 200 कोटींचे कर्जरोखे उभारले. शहर विकासासाठी अशाप्रकारे अभिनव उपक्रम राबविल्याने केंद्र सरकारने महापालिकेचे कौतुकही केले.
महापालिकेच्या 1,500 कोटी ठेवींचे काय?
केंद्र सरकारने या कर्जरोख्यांवर पालिकेस अनुदान स्वरूपात 26 कोटी दिले आहेत. हे अनुदान थेट पंतप्रधानांच्या हस्ते महापालिकेस देण्यात आले. मात्र, या योजनेचे काम अजूनही सुरूच झालेले नसल्याने ही रक्कम महापालिकेने बँकेत ठेवली आहे. या रकमेवर पालिकेस व्याज मिळत असले, तरी प्रत्यक्षात या कर्जरोख्यांवर प्रत्येक सहा महिन्यांनी व्याज मोजावे लागत असून डिसेंबरअखेरपर्यंत पालिकेने 22 कोटींचे व्याज मोजले आहे. त्यामुळे पालिकेच्या तब्बल 1,500 कोटी रुपयांच्या ठेवी वेगवेगळ्या बँकांमध्ये असताना हे कर्जरोखे काढण्याची आवश्यकता होती का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सल्लागार व प्रशासकीय कामावरच खर्च
गेल्या दीड वर्षात प्रशासनाकडून या कर्जरोख्यांमधील अवघे 5 कोटी खर्च झाले आहेत. ही रक्कमही सल्लागार आणि प्रशासकीय कामकाजावरच खर्च झाली आहे. तर, या योजनेसाठी जो पाण्याच्या टाक्यांचा खर्च केला जात आहे. तो खर्च केंद्राच्या अमृत’ योजनेचे अनुदान आणि पालिकेच्या अंदाजपत्रकीय तरतुदीमधून केला जात आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर केंद्र शासनाने महापालिकेची कानउघडणी करत हा निधी खर्ची पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने या कर्जरोख्यातील 50 कोटींची बँकेत असलेली सहा महिन्यांची मुदतठेव आता फक्त महिनाभरासाठी केली आहे. त्यामुळे केवळ केंद्राची नाराजी नको, म्हणून ही रक्कम खर्ची पाडली जाणार आहे.