पुणे । गेल्या आठ महिन्यात भाजपच्या कारभाराचे धिंडवडे निघू लागल्याने संदीप खर्डेकर यांच्यासारखा बोलका बाहुला पुढे करून अपयश झाकण्याचा प्रयत्न चालविला आहे, अशी टीका महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी दै. जनशक्तीशी बोलताना केली.महापालिका सभेत गेल्या सहा सात महिन्यात अनावश्यक विषयांवर चर्चा होऊन वेळेचा अपव्यय होतो आहे, असे मत व्यक्त करून भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी याबद्दल विरोधी पक्षाला जबाबदार धरले. याला उत्तर देताना तुपे म्हणाले, भाजप सत्तेवर आल्यावर अनेक घोटाळे झाले. भाजप कार्यकर्त्यांनी महापालिकेत तोडफोड केली. त्यातून जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला, तेव्हा खर्डेकर गप्प का बसले? भाजपने शहराचे विद्रुपीकरण केले ते दिसले नाही का?
विरोधकांनी गप्प का बसावे?
भाजपने सत्तेवर आल्यावर खूप चांगले काम केले आणि तरीही विरोधक ओरडताहेत, असे घडले का? कात्रज कोंढवा रस्त्याचे काम भाजपच्या नेत्याला मिळत नाही म्हणून त्यात घोळ घातला जात असताना आम्ही विरोधकांनी गप्प बसावे, अशी अपेक्षा आहे का? भाजप विरोधात असताना त्यांचे सभासद पालिका सभेत वेगवेगळे मुद्दे मांडून बोलायचे. विरोधकांनी बोलले पाहिजे त्यातून लोकशाही बळकट होते, असे ते म्हणायचे. आता सत्तेत आल्यावर भाजपची भाषा बदलली. खर्डेकर यांचा बोलाविता धनी वेगळाच असावा, असे तुपे यांनी सांगितले.