खर्‍या-खोट्या गुन्ह्यांवरून चाळीसगावात रंगले सोशल वॉर

0

चाळीसगाव (अर्जुन परदेशी)- शहराच्या नावलौकिकामध्ये हिंदू-मुस्लिम एकतेची मोठी भूमिका आहे. आजवर शहराच्या इतिहासात कधीही कोठेही दंगली सारखा प्रकार घडला नाही कारण सामाजिक सलोखा जपताना राजकीय जोडे बाजूला काढावे लागतात ते सूत्र आजपर्यत पाळले जात आहे ही वस्तुस्थिती कायम आहे मात्र काही वाचाळ कार्यकर्ते व काही दिशाभूल करणारे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते सोशल मीडियावर टाकणार्‍या कॉमेंटसमुळे वैर दिवसेंदिवस वाढतच असून त्याचा परीणाम शांतता प्रिय तालुक्याला भोगावा लागू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सोशल मीडिया वॉरकडे पोलिसांची करडी नजर आवश्यक असून त्यासोबतच नेत्यांनी आपापले वाचाळ व दिशाभूल करणारे कार्यकर्ते सांभाळण्याची जबाबदारीदेखील तितकीच आहे.

भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वॉट्सअपवर भिडले
नुकतेच राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक पाटील यांचे वर भाजप शहर सरचिटणीस अमोल नानकर यांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला त्यानंतर चाळीसगावात सोशल मीडिया वर खरे खोटे गुन्हे दाखल केले जातात या विषयावर सुरू असलेले आरोप प्रत्यारोप नजरेआड करता येणारे नाहीत हा सोशल वॉर तीन चार दिवसां पासून जोरात सुरू आहे .पोलिसांची सोशल मीडिया वर सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या राजकिय सोशल वॉर बाबत बोटचेपी भूमिका असून यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.

खर्‍या-खोटे गुन्ह्यांवरून चौका चौकात चर्चा ?
सध्या चाळीसगाव शहरात खरे-खोटे गुन्हे दाखल होत असल्याच्या संशयावरून राष्ट्रवादीच्या व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर तसेच चौका-चौकात जोरदार चर्चा सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून ही धगधग आता उग्र स्वरूप धारण करीत असल्याची वस्तुस्थिती आहे या वर्षी झालेल्या काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्या वर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत मात्र हे सर्वच गुन्हे खोटे असल्याचे चित्र सोशल मीडिया वर विविध प्रकारच्या पोस्ट टाकून जाहीर नाराजी व्यक्त केली जात आहे ही गोष्ट भविष्याच्या दृष्टीने चाळीसगाव सारख्या शांतता प्रिय शहरासाठी निश्चितच धोकादायक आहे गुन्हे खरे की खोटे हे ठरविण्याचा अधिकार कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना नाही हे पोलिसांचे म्हणणे आहे काही अपवाद वगळता सरसकट सर्वच गुन्हे खोटे असल्याचे मत व काही अपवाद वगळता सर्व गुन्हे खरे आहेत, असे मत राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व भाजप चे कार्यकर्ते व्यक्त करीत असते तर ही बाब अलाहिदा मात्र सरळ सरळ सर्व गुन्हे खरे खोटे असल्याचे चित्र समाजात रंगविले जाते आहे ही बाब राजकारण म्हणून टाळने शक्य असेल ही मात्र सामाजिक न्याय व्यवस्थेला आव्हान देणारी आहे त्यासाठी स्वतंत्र न्याय व्यवस्था अस्तित्वात असताना खुलेआम चर्चा होणे सामजिक व्यवस्थेच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे जाणकार मंडळी मत व्यक्त करीत आहेत.

नेत्यांनो, आपापले वाचाळ आणि दिशाभूल करणारे कार्यकर्ते सांभाळा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तथा पाणी पुरवठा सभापती दीपक पाटील यांनी मला घरी येऊन धमकी दिल्याची भाजप शहर सरचिटणीस अमोल नानकर यांची ‘एन्सी’ दाखल झाले नंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सोशल मीडिया च्या फेसबुक, वॉट्स अप या सर्व पातळीवर भिडले आहेत आरे ला कारे ने उत्तर दिले जात आहे या वर नियंत्रण ठेवणारा पोलिसांचा सायबर सेल सध्या तरी डोळेझाक करीत असल्याची वस्तुस्थिती आहे. हे सोशल वॉर असेच सुरू राहणे शांतताप्रिय शहरासाठी निश्चितच त्रासदायक असल्याचे स्पष्ट मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे यामुळे जनतेचा पोलिसांवर असलेल्या विश्वासाला तडा जाऊ शकतो हे नाकारता येणार नाही त्यामुळे पोलिस प्रशासनाप्रमाणे नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना सांभाळा, असे जनमत जोर धरू लागले आहे