नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू पाकिस्तान गेले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यावरून नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर टीका होत आहे. पाकिस्तानातील करतारपूर कॉरिडोरच्या भूमिपूजन कार्यक्रमात नवज्योतसिंग सिद्धू यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी एका खलिस्तानी दहशतवाद्यासोबत काढलेला फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
दिल्लीचे आमदार आणि अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंग सिरजा यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये खलिस्तानी दहशतवाद्यासोबत नवज्योतसिंग सिद्धू यांचा फोटो आहे. मनजिंदर सिंह सिरजा यांनी फोटो शेअर करत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना लक्ष्य केले. तसेच, नवज्योतसिंग सिद्धू यांना मंत्रिपदावरुन हटविण्याची मागणी केली आहे. याचबरोबर, विरोधी पक्षांकडून याप्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
बुधवारी पाकिस्तानमधील करतारपूर कॉरिडोरच्या भूमिपूजन कार्यक्रमात नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्ताने पंतप्रधान इम्रान खान यांचे भरभरुन कौतूक केले. तसेच आता गोळीबारी नकोय, प्रेम अन् शांती हवीय. त्यासाठी आपण सर्वांनीच आपले विचार बदलायला हवेत, असे नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटले.