जळगाव: जिल्ह्यातील उपक्रमशिल शिक्षक म्हणून ओळख असलेले आणि विविध पुरस्काराने सन्मानित किशोर पाटील कुंझरकर या शिक्षकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कुंझरकर यांचा खुन झाल्याची देखील चर्चा सुरु झाली आहे.
एरंडोल तालुक्यातील महामार्गालगत फाऊंटन हॉटेलजवळ पळासदळ शिवारात आज बुधवारी पहाटेच्या सुमारास मृतदेह आढळून आला. एरंडोल शहरातील कॉलनी भागात ते सध्या वास्तव्यास होते. गालापूर या आदीवाशी भागात ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. याघटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
काल मंगळवारी संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित होते, हे त्यांच्या समाजमाध्यमांवरील पोस्ट आणि स्टेटसवरुन दिसत आहे. मंगळवारी सकाळी कुंझरकर हे नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजेच्या सुमारास गालापूर येथे जाण्यासाठी बाहेर पडले. रात्रीउशीरापर्यंतही ते घरी न परतल्याने त्यांचा कुंटुंबीयांसह नातेवाईकांनी शोध सुरु केला असता हा प्रकार समोर आला. दरम्यान घर आणि गालापूरकडे जाण्याचा रस्ता हे दोन्ही वेगवेगळे शिवार आहे, असे असतांनाही कुंझरकर हे पळासदळ शिवारात पोहोचलेच कसे हा प्रश्न उपस्थित होत आहे.