नंदुरबार । नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे आज 9 एप्रिल रोजी क्रांतीवीर खाज्या नाईक यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ आदिवासी सामाजिक कार्यकर्त्या रंजनाताई पावरा व यमुनाताई पावरा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. खांडबारा (ता.नवापूर) येथील क्रांतीवीर खाज्या नाईक राष्ट्र सेवा दलातर्फे आज 9 एप्रिल रोजी रविवार रोजी ऍग्री हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, खांडबारा येथे क्रांतीवीर खाज्या नाईक जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शोभायात्रेत कलापथकांचा असणार सहभाग
यावेळी सकाळी प्रभातफेरी होवून 9 वाजता शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. यात विविध आदिवासी कलापथकांचा सहभाग राहणार आहे. शोभायात्रेनंतर ऍग्री हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात सामाजिक कार्यकर्ते रंजनाताई पावरा आणि यमुनाताई पाडवी हे “आदिवासी युवा नेतृत्वापुढील आव्हाने” या विषयावर प्रबोधन करणार आहेत. कार्यक्रमास पंचक्रोशीतील समस्त आदिवासी समाज बांधव, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, महिला आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आयोजक क्रांतीवीर खाज्या नाईक राष्ट्र सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र रावजी वळवी, बहादूरसिंग वळवी, विशाल नाईक यांनी कळविले आहे.