खांडेकर शाळेत अवघे दोनच शिक्षक

0

सहकारनगर : येथील वि.स. खांडेकर इंग्रजी माध्यम शाळेला मुख्याध्यापकच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. मुख्याध्यापक तर नाहीच शिवाय शिक्षकांचीही कमतरता आहे.

मुख्याध्यापक नसलेल्या या शाळेत 11 शिक्षकांची गरज असताना, अवघ्या दोन शिक्षकांवर शाळेचा गाडा हाकला जात आहे. ही बाब समजताच यावर उपाय म्हणून स्थानिक नगरसेविका दिशा माने यांनी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी स्वत: शाळेत जाऊन शिक्षिकेची जबाबदारी पार पाडली. याप्रसंगी पालक व शाळेचे कर्मचारी अवाक झाले, तर विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

माने यांनी आदर प्रतिष्ठानतर्फे स्वत: खर्च करून शाळेत पूर्वी शिकत असलेले दोन शिक्षक रुजू केले आहेत. शाळा नूतनीकरणासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत; मात्र शिक्षण मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्यांच्या कराचा चुराडा व मुलांचे भवितव्य अंध:कारमय झाले आहे.

वि.स. खांडेकर इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. यावर उपाय म्हणून स्वत:च प्रभारी मुख्याध्यापकांच्या परवानगीने वर्ग घेतला, तसेच आदर प्रतिष्ठानतर्फे वेतन देऊन दोन शिक्षक रुजू केले आहेत. भविष्यात शाळेत शिक्षक व कर्मचारी जागा भरण्यासाठी शिक्षण प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
दिशा माने, नगरसेविका