दहा वर्षांत 117 भीषण अपघात, 73 जणांचे गेले बळी
वळण काढून टाकण्यासाठी लिहिलेली 50 पत्रे केराच्या टोपलीत!
पुणे : पुण्याजवळील राष्ट्रीय महामार्गावरील खांबटकी घाटातील नागमोडी वळण हे जीवघेणे ठरत असून, आतापर्यंत या वळणावर 116 भीषण अपघात झाले आहेत. तर त्यात 55 जणांचे बळी गेले आहेत. हे वळण काढण्यात यावे, यासाठी 2008 पासून ते 2018 पर्यंत तब्बल 50 पत्रे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास पाठविण्यात आली होती. त्या सर्व पत्रांना प्राधिकरणाने केराची टोपली दाखविल्याने कालच पुन्हा एकदा 18 मजुरांचा बळी गेला. म्हणजेच, या नागमोडी वळणाने आतापर्यंत 73 जणांचे बळी घेतले तरी, प्राधिकरण गेंड्याची कातडी पांघरून झोपी गेले आहेत. मुंबई-बेंगळुरु या राष्ट्रीय महामार्गावरील पुणे-सातारादरम्यान तब्बल चार अपघातप्रवण स्थळ निष्पन्न झाले असून, त्यात खांबटकी घाटातील नागमोडी वळण हे सर्वात घातक आहे. वाहन थोडे जरी वेगात असले तरी येथे अपघात हा ठरलेलाच असतो. परंतु, हे वळण काढण्यात मात्र हेतुपुरस्सर विलंब होत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.
नागमोडी वळण ठरते जीवघेणे!
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग चारवरील खांबटकी घाटातील हे नागमोडी वळण प्रचंड जीवघेणे ठरले आहे. वाहनचालकांना वेगातील वाहन वळविताना मोठी कसरत करावी लागते. मंगळवारी कर्नाटकातील विजापूर येथील 18 मजुरांवर याच वळणावर काळाने घाला घातला. रात्रीच्यावेळी हे वळण सहजासहजी दिसून येत नाही. तसेच, समोरुन येणार्या वाहनावर वाहन धडकण्याचा धोका वाढलेला असतो. पुणे व सातारा महामार्ग पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास या वळणाचा आकार कमी करण्याबाबत तसेच शक्य झाल्यास हे वळणच काढून टाकण्याबाबत तब्बल 50 पत्रे लिहिली आहेत. परंतु, या पत्रांना केराची टोपली दाखविण्यात आली. त्यामुळे या वळणावर अपघाताचे सत्र सुरुच आहे. कालच्या घटनेसह एकूण 117 भीषण अपघात या वळणावर घडले असून, 73 जणांचे बळी गेले आहेत.
भूसंपादनास अडकाठी, जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांशी संपर्क साधण्यात आला असता, त्यांनी सांगितले, की प्राधिकरणाने साडेसहा किलोमीटरचा मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. त्यात अतिरिक्त बोगदा टाकण्याचा व मार्ग सरळीकरणाचा प्रयत्न केला जाणार आहे. परंतु, या प्रकल्पासाठी अद्याप 80 टक्केच भूसंपादन झाल्याने व त्यासाठी जमिनी देण्यास स्थानिक गावकर्यांनी विरोध केल्याने हा प्रकल्प रखडलेला आहे. खंडाळा, वेले, आणि वनाची वाडी या गावातील शेतकर्यांच्या जमिनी त्यासाठी संपादीत कराव्या लागणार आहेत. त्यासाठी पुणे व सातारा जिल्हाधिकारी कार्यालयास भूसंपादनाची कारवाई करण्याबाबत विनंतीही करण्यात आली होती. परंतु, जिल्हा प्रशासनाने पाऊले उचलली नाहीत. त्यामुळे हे नागमोडी वळण काढून तेथे बोगदा किंवा सरळ रस्ता तयार करण्याचे काम रखडलेले आहे, अशी माहितीही प्राधिकरण सूत्राने दिली आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला तर पुढील तीन महिन्यातच हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकतो, असेही या सूत्राने स्पष्ट केले. अपघात टाळण्यासाठी या नागमोडी वळणावर मेटल क्रॅश बॅरिअर लावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.