डॉ. युवराज परदेशी
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ सज्जनाचे रक्षण अन् दुर्जनांचा विनाश… हे ब्रिद घेऊन कायदा-सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी झटणार्या पोलीस दलाच्या लौकिकाला किंबहुना विश्वासार्हतेला काळीमा फासण्याचा प्रयत्न ‘खाकी’ वर्दीत दडलेल्या जम्मू-काश्मीरचा पोलीस उपअधीक्षक देवींदर सिंगने केला आहे. येत्या 26 जानेवारीला नवी दिल्लीसह अन्य काही ठिकाणी दहशतवादी हल्ले घडविण्याचे मनसूबे ठेवणार्या दोन दहशतवाद्यांना देवींदर सिंगने अवघ्या 12 लाख रुपयांच्या मोबदल्यात स्वत:च्या गाडीत नवी दिल्ली व आग्रा येथे फिरविले. एवढेच नव्हे तर स्वत:च्या घरात या दहशतवाद्यांना लपवून ठेवल्याचेही तपासात समोर आले आहे. छत्तीसगड इंडो-तिबेटीयन पोलिसांच्या पथकाने 15-20 गावकर्यांना नक्षलवादी असल्याचे सांगत ठार केल्याच्या धक्कादायक प्रकारातून पोलिसांची प्रतिमा कशीबशी सावरत असताना आतातर पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकार्याचे थेट दहशतवाद्यांशी कनेक्शन उघड झाल्याने कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलीस दलातील भ्रष्टाचार व अनैतिक गोष्टी दररोज वृत्तपत्रातून छापून येत असतात. याची पडताळणी करण्यासाठी लाचलुचपत विभागाकडील आकडेवारी पुरेशी ठरते. गेल्या सात महिन्यात राज्यभरात लाचखोरीची 498 प्रकरणे समोर आली असून 661 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात 158 महसुल विभागाच्या अधिकार्यांचा तर 152 पोलीस अधिकार्यांचा समावेश आहे. लाचखोरीत पोलीस विभाग दुसर्या क्रमांकावर असणे ही लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल. मात्र याबद्दल पोलिसांना ना खेद वाटतो ना खंत! सर्वसामान्यांच्या सुरक्षितेबाबत पोलीस अधिकार्यांनी कितीही बढाया मारल्या तरी तोच पोलीस अधिकारी मलाईदार पोलीस ठाण्यात पोस्टिंग मिळविण्यासाठी राजकारण्यांचे उंबरठे झिजवतो, हे आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. स्थानिक गुन्हे शाखा असो की दहशतवाद विरोधी पथक कोणत्याही ठिकाणी बदली किंवा बढती हवी असेल तर वरिष्ठ अधिकार्यांना लाखो रुपये द्यावे लागतात हे पोलीस दलातील उघड सत्य आहे. गुंडाना पकडणारे हात नेत्यांना सलाम करण्यात गुंतले जातात. आणि याहीपलीकडे काही पोलीस अधिकारी गुंडांनाच सामील होतात व खोटे एन्काऊंटर करुन सुपार्या घेतात. मुंबईच्या चकमकी हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येतील. मुंबईतल्या गुन्हेगारी टोळ्याविरोधी टोळीतल्या गुंडाचा खात्मा करण्यासाठी पोलिसांना कशा टिप्स देत होत्या, यावरही आतापर्यंत बरीच चर्चा झाली आहे. यावर अनेक चित्रपट देखील निघाले आहेत. अवैध प्रवाशी वाहतूक करणारी वाहन असोत की वाळू, खडी, दगड, मुरूम वाहतूक करणारी वाहन, एवढेच काय अनेक वरिष्ठ अधिकारी हे प्लॉटिंग, भिशी, सट्टा, हॉटेलिंग अशा अनेक व्यवसायात भागीदार असल्याची अनेक उदाहरणे आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर्या करणारे, पाकिटमार, मंगळसूत्र चोरणारे, बॅग लंपास करणारे लोक कोण आहेत हे पोलिसांना माहीत असते. पूर्वी पोलिसांची एवढी जरब होती की एखाद्या भांडणाच्या ठिकाणी पोलीस आला आहे हे जरी कळले तरी प्रक्षुब्ध झालेला जमाव शांत होत असे व टवाळखोर तेथून पळ काढत असे मात्र आज असे चित्र कुठेही दिसत नाही. त्या उलट भररस्त्यावर पोलिसांना मारहाण किंवा शिव्या देण्याचे व्हिडीओ सोशल मीडियामध्ये जास्त व्हायरल होतांना दिसतात. याला काही अपवाद देखील आहेत. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये 27 वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून जाळून मारण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपींचे एन्काऊंटर केल्यानंतर हैदराबाद पोलिसांचे देशभरात कौतुक झाले. हे एन्काऊंटर खरे की खोटे हा वाद सुरु असला तरी हैदराबाद पोलिसांच्या कामगिरीनंतर कौतुकाचा पाऊस पडला. मात्र असे प्रसंग क्वचितच येतात. पोलिसांची हप्ता वसुली, भ्रष्टाचार इतपर्यंत ठिक होते मात्र आता पोलिसांचे थेट दहशतवाद्यांशी असलेले कनेक्शन समोर आल्याने खाकी डागाळली आहे. जम्मू-काश्मीरचा पोलीस उपअधिक्षक देवींदर सिंगला दोन दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. देवींदर 1990 मध्ये उपनिरीक्षक पदावर जम्मू-काश्मीर पोलिसांत भरती झाला होता. तो दहा वर्षे विशेष ऑपरेशन ग्रुपमध्ये सहभागी होता. देवींदरवर अमली पदार्थ तस्करांना मदत करणे, हप्ते वसुलीचेही आरोप आहेत. तो जम्मू-काश्मीर पोलिसांच्या अँटिहायजॅकिंग युनिटसोबतही कार्यरत होता. देवींदरला 2018 मध्ये जम्मू-काश्मीर राज्य सरकारने शौर्यपदक प्रदान केले होते. पुलवामात 25-26 ऑगस्ट 2017 मध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्याच्या विरोधातील मोहिमेत सहभागी झाल्याबद्दलही गौरवण्यात आले होते. मात्र याच देवींदरला दोन दहशतवाद्यांसोबत रंगेहात पकडण्यात आले. देवींदरसोबत दोन दहशतवाद्यांची देखील चौकशी करण्यात आली. दोन्ही दहशतवाद्यांनी देवींदरच्या इंदिरा नगर येथील घरात उतरलो होतो, अशी कबुली दिल्याने पोलीस दलाची अब्रु वेशीवर टांगली गेली. देवींदर श्रीनगरच्या इंदिरा नगरमध्ये लष्करी तळाजवळ 2017 पासून आलिशान घर बनवत होता. हा भाग श्रीनगरमध्ये अतिशय सुरक्षित असा मानला जात होता. या घराची भिंत 15 कॉर्प्सच्या मुख्यालयास लागून आहे. अशा ठिकाणी त्याने दहशतवाद्यांना लपवून ठेवले होते, यास काय म्हणावे? एकीकडे दहशतवाद्यांशी लढतांना आपले जवान शहीद होतात. सीमेवर लढणारे जवानच नव्हे तर पोलीस दलात कार्यरत असणारे कामटे, साळसकर, करकरे, ओंबळे यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी देखील दहशतवाद्यांशी लढतांना शहीद झाले आहेत. यांच्यासारख्या पोलिसांच्या बलीदानामुळे आज सर्वसामान्य माणून सुरक्षित आहे. मात्र अशी माणसे पोलीसदलात क्वचितच दिसतात. हे तितकेच खरे आहे. देशात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभुमीवर आधीच पोलिसांवरील विश्वास अधीच कमी होत असताना आता एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याचे थेट दहशतवाद्यांशी कनेक्शन उघड झाले आहे. याचे तार थेट संसदेवर हल्ला केलेल्या कुख्यात दहशतवादी अफजल गुरुपर्यंत भिडत असल्याने हा दाग कधीच धुतला जाणार नाही, याची जाणीव पोलीस दलाला आहे. मात्र एका भ्रष्ट अधिकार्यामुळे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कर्तव्यदक्षपणे जबाबदारी पार पाडणार्या अन्य प्रामाणिक पोलिसांच्या मनोबलावर परिणाम होईल, याचे काय करायचे?