खाकी डागाळली ; रावेरमध्ये लाखाचा पकडलेला गुटखा सोडला ?

0

गुटखा तस्करी ऐरणीवर ; पोलिस निरीक्षकांकडून ‘त्या’ कर्मचार्‍याची चौकशी

रावेर- बर्‍हाणपूरकडे टाटा मॅजिक वाहनात अवैधरीत्या एका व्यापार्‍याचा गुटखा येत असल्याची गोपनीय माहिती रावेर पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्‍याला कळाल्यानंतर त्याने गाडी अडवत गुटखा पकडला खरा मात्र गुन्हा न दाखल करताच वाहन आर्थिक घेवाण-देवाण करून सोडण्यात आल्याची जोरदार चर्चा शहरात आहे तर या प्रकाराची पोलिस निरीक्षकांनी गांभीर्याने दखल घेत त्याच कर्मचार्‍याची कसून चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

गुटख्याची तस्करी ऐरणीवर
महाराष्ट्रात गुटखा बंदी असल्याने नजीकच्या मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूरातून मात्र खाजगी वाहनांद्वारे दररोज लाखोंचा गुटखा रावेर भागातून जळगाव जिल्ह्यात येतो. 14 रोजी टाटा मॅजिक वाहनाद्वारे गुटखा येत असल्याची गोपनीय माहिती एका कर्मचार्‍याला मिळाल्यानंतर त्याने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील एका व्यापार्‍याचा बारदानमधील लाखोंचा गुटखा पकडला मात्र कारवाई करून गुन्हा नोंदवण्याऐवजी या कर्मचार्‍याने हा गुटखा एकांतात नेवून आर्थिक घेवाण-देवाण करून प्रकरण परस्पर मिटवल्याची जोरदार चर्चा रावेर शहरात आहे. एकीकडे रावेरचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी अवैध दारूसह गुटखा, सट्टा अड्ड्यांवर कारवाईचा धडाका लावला असताना दुसरीकडे खाकीलाच डाग लावण्याचे काम कर्मचारी करीत असल्याने सुज्ञ नागरीकांमधून या प्रकाराबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. या गुटखा प्रकरणाची आपण चौकशी करत असल्याचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.