खाजगी बस – पिकअपचा अपघात; दोन ठार, दहा जखमी

0

रस्त्यावरील मातीचा ढिगारा चुकवताना झाला अपघात

अंबाजोगाई : लातूर येथील लग्न समारंभ आटोपून येणारी खाजगी बस आणि पिकअपचा अंबाजोगाई जवळील सेलूआंबा येथे भीषण अपघात होऊन दोघे ठार तर दहा जण जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री झाला. गुत्तेदाराने अर्ध्या रस्त्यात टाकून ठेवलेला मातीचा ढिगारा चुकवताना हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी चक्का जाम करत वाहतूक बंद पाडली.

अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथील तरुणाचे रविवारी दुपारी लातूर येथे लग्न पार पडले. या लग्नाचे वऱ्हाड घेऊन खाजगी बस (एमएच ४४ यू ८१७१) अंबाजोगाईकडे येत होती. रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास ही बस सेलूआंबा येथे आली असता अर्ध्या रस्त्यापर्यंत टाकण्यात आलेला मातीचा ढिगारा चुकवताना बसने समोरून येणाऱ्या पिकअप गाडीला धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या मध्ये सापडून जनावरांना पाणी पाजण्यासाठी निघालेले पांडुरंग शेषेराव ढोपरे (वय ४५,रा. सेलूआंबा) यांचा आणि पिकअप मधील सतीश शंकर राठोड (वय ३५, रा. गरसुळी तांडा) या ग्रील कंपनीच्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. बसमधील मुक्ता प्रसाद भगत (वय ३५), शांताबाई लोमटे (वय ६०), कस्तूरबाई लोमटे (वय ६०), कौशल्या भगत (वय ६५), पद्मिन बाबुराव भगत (वय ६०) आणि मीनाबाई सुरज कुंभार (वय ४०) सर्व रा. वाघाळा या सहा महिला किरकोळ जखमी झाल्या. सर्व जखमींवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर डॉ. निलेश लोमटे, अंबाजोगाई पंचायत समितीचे उपसभापती तानाजी देशमुख, रघुवीर देशमुख, प्रदीप देशमुख, मेघराज निकम, जगन्नाथ बरुरे, बालाजी जाधव, शिवराज औताडे यांनी जखमींना उपचारासाठी पाठविण्याकामी मदत केली.

अरुंद रस्ता आणि गुत्तेदाराच्या निष्काळजीपणाचे बळी

अंबाजोगाई – लातूर हा रस्ता बर्दापूर पर्यंत चौपदरी आहे, त्यांनतर विनाकारण दुपदरी करण्यात आला आहे. हा रस्ता प्रचंड वर्दळीचा असून तो अचानक निमुळता झाल्याने ते धोक्याचे झाले आहे. त्यातच गुत्तेदाराने अर्ध्या रस्त्यापर्यंत माती टाकून ठेवल्यानेच हा अपघात झाला.

संतप्त ग्रामस्थांनी अडवली वाहतूक

दरम्यान, अपघातानंतर संतप्त सेलू अंबा ग्रामस्थांनी गुत्तेदाराच्या निषेधार्थ काही काळ वाहतूक अडवून धरली होती. गुत्तेदाराच्या चुकीमुळे सतत लहानमोठे अपघात घडत आहेत, त्यामुळे जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी अशी ग्रामस्थांची मागणी होती. परंतु, अंबाजोगाई ग्रामीणचे फौजदार जाधव, कर्मचारी डापकर, आघाव, नागरगोजे यांनी ग्रामस्थांची समजूत घालत वाहतूक सुरळीत करून दिली.