नवापूर : नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा व धडगाव नगरपालिका हद्दीतील व अक्कलकुवा ग्रामपंचायत हद्दीतील पेट्रोल पंपावरून सर्व दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना पेट्रोल व डिझेलचे वितरण 31 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीपासून बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असूनह जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांना घराबाहेर निघण्याची सवलत देण्यात आली आहे. या सवलतीलचा गैरफायदा घेऊन नागरिक अनावश्यकरित्या दुचाकी व इतर वाहनांमधून फिरत असतात. त्यामुळे प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर प्रतिकूल परिणाम होण्याची आणि करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने सदर निर्बंध घालण्यात आले आहेत.
वरील क्षेत्रात पेट्रोल पंप धारकांनी केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांनाच पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून द्यावे. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांसाठी तसे पासेस नगरपालिका मुख्याधिकारी व ग्रामपंचायत अक्कलुकवाचे ग्रामसेवक यांनी द्यावेत.
नागरिकांनी किरणा, दूध, भाजीपाला व औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आवश्यकता असेल त्यावेळी वाहनाचा वापर करू नये. अशावेळी शक्यतो जवळच्या ठिकाणावरून वस्तू खरेदी कराव्यात. जवळ वस्तू उपलब्ध होण्यासाठी तालुका प्रशासनामार्फत वॉर्डनिहाय व कॉलनीनिहाय नियोजन करण्यात आले आहे.
या आदेशाचा भंग करणाऱ्या पेट्रोल पंप धारकांवर भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.