जळगाव। जिल्ह्यातील निकृष्ट पोषण आहार प्रकरणी दररोज नवनवीन प्रकार उघडकीस येत आहे. पोषण आहार प्रकरणी चौकशी सुरु असतानांही पुरवठादाराकडून सर्रासपणे नियमाचे उल्लंघन करुन पोषण आहार पुरवठा सुरु आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी निकृष्ट पोषण आहार आढळून आल्याने चौकशी सुरु आहे. जिल्ह्यातील 13 शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार आढळून आल्याने सीईओंच्या आदेशान्वये संपुर्ण जिल्ह्याभरात चौकशी सुरु आहे. तक्रारदार पल्लवी सावकारे यांच्या मागणीनुसार निकृष्ट आहार बदलून त्याठिकाणी नवीन धान्यांदीचा पुरवठा केला जात आहे. मात्र नव्याने करण्यात येत असलेल्या धान्यांदी देखील निकृष्ट आढळून येत असल्याची तक्रार आहे. दरम्यान पुरठादाराने पुन्हा एकदा नियमाचे उल्लंघन केले आहे. पुरवठादाराकडून चक्क खाजगी चारचाकी कारमधुन पोषण आहार धान्यांदीचा पुरवठा केला जात आहे. कुर्हा येथे पुरवठादाराकडून खाजगी वाहनाने धान्य पुरवठा केला जात असल्याचे आढळून आले. जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी शाळेत जावुन वाहनातील धान्यांची तपासणी केली. याबाबत उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सदस्य जयपाल बोदडे यांनी सीईओं यांची भेट घेत तक्रार केली. यावेळी शिक्षण सभापती पोपट भोळे, जि.प.सदस्य मधुकर काटे उपस्थित होते.
मुख्य सचिवांना पत्र
पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे उघड झाल्यानंतर तक्रारदारांनी चौकशीची मागणी करत सातत्याने पाठपुरवा सुरु केला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत देखील हाच विषय विशेष गाजला. यावेळी ठेका रद्द करुन प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशीची मागणीचा ठराव पारीत करण्यात आला आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे स्वतःठरावाची शहानिशा करुन मुख्यसचिव यांच्याकडे पाठविणार आहे.
नियमाचे उल्लंघन
शालेय पोषण आहार पुरवठा करारात धान्य पुरवठा करणारी वाहन ही शासकीय असायला हवी व या वाहनावर शासनाचा हुद्दा असणे गरजेचे असल्याचे नमुद आहे. खाजगी वाहनाने पुरवठा करणे कराराचा भंग करणे असून खाजगी वाहनाने पुरवठा करुन पुरवठादाराने नियमाचे उल्लंघन केले आहे. पुरवठादारावर कारवाई करावी अशी मागणीही तक्रारदार सावकारे यांनी केले आहे. पुरवठादाराकडून खाजगी वाहनाने पुरवठा करण्याचा दुसरा प्रयत्न आहे.
शालेय पोषण आहार मधील वाटाणा व मुगदाळ बदलून देण्यासाठी पोषण आहार ठेकेदार राजू माळी त्यांच्या स्वत:च्या वाहनाने शाळेत आले होते. सोबत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा साधना सपकाळे, सुनंदा वराडे, उत्तम काळे, नारायण कोळी हजर होते. सर्वांनी प्रत्यक्ष माल बघून चांगला असल्याबद्दल समाधान व्यक्त केले व सर्वानुमते निर्णय घेवून माल बदलून घेण्यात आला. सोबत जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे सुध्दा उपस्थित होत्या.
मुख्याध्यापक, कुर्हा
पोषण आहाराची मालवाहतूक वाहक जळगावहून येताना पंक्चर झाल्यामुळे जवळपास पंक्चर सुधारण्याचे कोणतेही दुकान नव्हते. अशातच शाळेतील कर्मचार्यांचा फोन आल्यामुळे माझ्या खाजगी वाहनाने येत असताना तो पोषण आहार माझ्या खाजगी गाडीत टाकून कुर्हा येथील शाळेला दिला. खात्री करुन मुख्याध्यापक व कर्मचार्यांनी चांगल्या प्रतीचा धान्य असल्याचे लेखी दिले आहे.
राजू माळी, ठेकेदार
बिले थांबविण्याची मागणी
गेल्या पंधरा दिवसापासुन पोषण आहार प्रकरण उघड झाल्यानंतर चौकशी सुरु आहे. अद्यापही चांगल्या प्रतिचा धान्य पुरवठा होत नसून चौकशी सुरु आहे. चौकशी सुरु असल्याने पुरवठादाराला देयक रक्कम देण्यात येऊ नये अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सदस्य जयपाल बोदडे यांनी सीईओ आणि शिक्षण समिती सभापती पोपट भोळे यांच्याकडे केली. सीईओ तक्रारदाराकडी मागणीचा प्रत मुख्यसचिव यांच्याकडे पाठवित असल्याचे सांगितले.