खाजगी व्यापार्‍यासह पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात

चोपडा उपजिल्हा रुग्णालय आवारात एसीबीचा सापळा यशस्वी : आरोपी नगरदेवळा येथील रहिवासी : 40 टक्क्यांवर दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी स्वीकारली दहा हजारांची लाच

जळगाव/भुसावळ : दिव्यांग बांधवांला 40 टक्क्यांवर दिव्यांगबाबतचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दहा हजारांची लाच मागणी करून ती चोपडा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात स्वीकारताना खाजगी पंटरांसह व्यापार्‍याला अटक करण्यात आल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. जळगाव एसीबीने मंगळवारी दुपारी हा सापळा यशस्वी केला. अनिल तुकाराम पाटील (46, रा.नगरदेवळा, ता.पाचोरा) असे अटकेतील खाजगी पंटराचे तर विजय रूपचंद लढे (67, रा.नगरदेवळा, मारवाडी गल्ली, ता.पाचोरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

डॉक्टरांशी ओळख असल्याचे सांगत मागितली लाच
पारोळा तालुक्यातील कंकराज येथील 49 वर्षीय तक्रारदार हे हाताने दिव्यांग आहेत. त्यांना हाताचे दिव्यांग बाबतचे प्रमाणपत्र 40 टक्क्यांवर वाढवून देण्यासाठी व हे काम ज्या डॉक्टरांकडे आहे, ते डॉक्टर माझे ओळखीचे असल्याचे अनिल पाटील या संशयीताने तक्रारदाराला सांगत मंगळवार, 30 रोजी पंचांसमक्ष दहा हजारांची लाच मागणी केली होती. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. चोपडा उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात तक्रारदाराकडून संशयीत आरोपी अनिल पाटील याने दहा हजारांची लाचेची रक्कम स्वीकारून ती व्यापारी विजय लढे यांच्याकडे दिल्यानंतर दोघांना जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली.

यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, प्रभारी अपर अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस. पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सहा.फौजदार दिनेशसिंग पाटील, सहा.फौजदार सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, पोलीस नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, पोलीस नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.

‘त्या’ डॉक्टरांच्या अडचणी वाढल्या
खाजगी इसमाने दिव्यांग बांधवाला 40 टक्क्यांवर प्रमाणपत्र मिळवून देण्याची हमी एका डॉक्टरांच्या नावाने दिली होती शिवाय हे डॉक्टर संशयीताचे ओळखीचे असल्याने यापूर्वी अशा पद्धत्तीने किती दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले शिवाय हा डॉक्टर नेमका कोण? या प्रश्नांची उत्तरे आता आरोपींच्या पोलीस कोठडीतील चौकशीतून मिळणार आहे.