पीआरपीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणेंचा पत्रकार परीषदेत इशारा
भुसावळ- शहर व परीसरातील खाजगी शैक्षणिक संस्थांकडून प्रवेश शुल्काच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे. यामध्ये सर्वाधिक लूट ही शहरातील सेंट अँलायसेस हायस्कूलमध्ये होत असल्याने शिक्षण विभागाने याची दखल न घेतल्यास विविध प्रकारचे साप्ताहिक आंदोलन करण्याचा ईशारा पीआरपीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी शुक्रवारी शहरातील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परीषदेत दिला.
सेंट अलॉयीसीस शाळेबाबत सर्वाधिक तक्रारी
शहर आणि परीसरातील खाजगी शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश शुल्काच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सर्व सामान्य नागरीकांची आर्थिक लूट केली जात आहे. यामध्ये विशेष करून शहरातील सेंट अलॉयसीस या शैक्षणिक संस्थेचा समावेश असून या संस्थेत प्रवेशाकरीता कुणाचीही दाद पुकार घेतली जात नाही. संस्थेत नियमबाह्य शिक्षण भरती केली जात असून यामध्ये केवळ ख्रिस्ती बांधवांनाच प्राधान्य दिले जात असल्याने या संस्थेविषयी अनेक पालकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे शिक्षण विभागाने या संस्थेची सखोल चौकशी करून सर्वसामान्य नागरीकांना न्याय दिल्यास पीआरपीच्या माध्यमातून विविध प्रकारचे साप्ताहीक आंदोलन करण्यात येईल, असे जगन सोनवणे यांनी सांगितले.
प्रवेश शुल्काचा पैसा संस्थाचालकांच्या खिशात
प्रवेश शुल्काच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या घेण्यात येणार्या पैशांची पावती चर्च व धर्माची अनुदान प्राप्त अशा नावाने दिली जाते तर के.नारखेडे व इतर माध्यमिक विद्यालयांमध्ये संगणक शुल्काच्या नावाखाली हजारो रूपयाची सर्रास लूट केली जात असल्याचा प्रकार समोर आला असल्याचेही सोनवणे म्हणाले.
असे राहिल साप्ताहिक आंदोलन
खासगी शैक्षणिक संस्थाकडून सर्वसामान्य पालकांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी 6 जुलै रोजी जिल्हा माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी जळगाव येथे टाळे ठोको आंदोलन, 9 रोजी सेंट अलॉयसीस हायस्कूलला टाळे ठोको व रस्ता रोको, 12 रोजी सेंट अलॉयसीस हायस्कूलसमोर एक दिवसीय चेतावणी धरणे आंदोलन, 16 रोजी आमदार प्रा.जोंगेद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेवून लक्षवेधी सुचनेबद्दल निवेदन, 18 रोजी तीन दिवस हल्लाबोल अशा पद्धतीचे आंदोलन केले जाणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
तक्रार करण्याचे आवाहन
खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये पालकांची होणारी आर्थिक लूट संदर्भात पक्षाच्या ‘भीमालय’ या कार्यालयात तक्रार पेटी लावली जाणार आहे. आर्थिक लूट झालेल्या पालकांनी या पेटीत आपली तक्रार न घाबरता टाकावी, असेही जगन सोनवणे यांनी पालकांना आवाहन केले आहे. पत्रकार परीषदेला रामजी आंबेडकर विद्यालयाचे प्राचार्य सपकाळे, राकेश बग्गन, राजू डोंगरदिवे, हरीष सुरवाडे, अजय कोळी, चंद्रकला कापडणे, संगीता ब्राम्हणे, तुषार शिवपुजे यांची उपस्थिती होती.