पुणे : खाजगी संस्थेला एक कोटी वीस लाख रुपये देऊन महापालिकेच्या प्राथमिक शाळांचे मूल्यांकन करण्यास आपला विरोध आहे असे मत नगरसेविका अश्विनी कदम यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा
प्राथमिक शाळांचे मूल्यांकन खाजगी संस्थेमार्फत करण्यात यावे असे विषयपत्र महापालिकेच्या मुख्य सभेत मांडण्यात आले होते. त्यास त्यांनी विरोध केला असून पत्राबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. महापालिकेमध्ये २८७ शाळांचा समावेश आहे. एक कोटी वीस लाख रुपये खाजगी संस्थेला देऊन थर्ड पार्टी आणून फक्त १० शाळांचे मुल्यांकन करताना शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करणे अतिशय खेदजनक आणि हास्यास्पद आहे. एका शाळेचे मूल्यांकन करण्यासाठी बारा लाख रुपये खर्च करायचे आणि रिझल्ट शून्य मिळणार याऐवजी एक शिक्षिका आणि नगरसेविका या नात्याने महापालिकेच्या शिक्षण विभागाने माझ्यावर सर्व शाळांची जबाबदारी द्यावी. मी सर्व जबाबदारी पार पाडून दाखविते असे कदम यांनी म्हटले आहे.
महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी सहाय्यक शिक्षणप्रमुख, पर्यवेक्षिका यांचे विशेष पद कार्यरत असताना मूल्यांकनावर खर्च करण्याची काहीही गरज नाही. या पदांच्या जबाबदाऱ्या ठरवून दिल्या तर निश्चितपणे शाळांचे मूल्यांकन आपोआपच सुधारेल अशीही सूचना कदम यांनी केली आहे.