कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्मार्ट सिटीअंतर्गत खाडीकिनारी नवे कल्याण वसवण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण पश्चिमेतील सापाड व वाडेघर या भागात खाडीकिनारी २५० हेक्टर जमिनीवर हे नवे शहर वसवण्याचा पालिकेचा मानस आहे. या योजनेला सरकारची मंजुरी मिळाली की त्यासाठी २५० हेक्टरपैकी सध्या आरक्षित असलेला तब्बल १३२ हेक्टर ग्रीन झोन खुला होऊन त्यावर रहिवास तसेच कमर्शिअल विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.कल्याण पश्चिमेतील सापाड व वाडेघर परिसरातील बहुतांश भाग ग्रीन झोन असल्याने त्या भागाचा फारसा विकास होऊ शकलेला नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत या भागासाठी नवी नगररचना योजना गुरुवारी पालिकेने जाहीर केली. त्यासाठीचा उद्देश (इन्टेन्शन) घोषित करण्याचा प्रस्ताव गुरुवारी महासभेने मंजूर केला.
महासभेने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यापासून त्यासंदर्भात सरकारी राजपत्रात माहिती प्रसिद्ध केली जाईल. त्यावर हरकती व सूचनांनुसार बदल केल्यावर नऊ महिन्यांत त्याचा आराखडा राज्य सरकारला सादर होणार. सरकारच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीला प्रारंभ होणार आहे. भू संपादनावरून वाद उद्भवल्यास त्यासाठी खास लवादही नेमला जाणार आहे.