बाणकोर्ट । श्रीवर्धन सावित्री नदी व बाणकोट खाडी पात्रात ड्रेझरच्या परवानगीचे नियम व अटी धाब्यावर बसवून दिलेल्या चिन्हांकित क्षेत्राच्या बाहेरील क्षेत्रात दिवसरात्र अवैध रेती उत्खनन होत असल्याच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत बाणकोट येथील ग्रामस्थ आरिफ जलाल, जुनेद जलाल, निजाम जलाल सरकार शिवसेना तालुका प्रमुख प्रतोष कोलथरकर यांनी उप विभागीय अधिकारी सोनू पवार यांच्याकडे निवेदन सादर केला. सावित्री नदी व बाणकोट खाडीच्या पात्रात संयुक्त रेती उपगट क्र बी बी 2 व सी सी 1 / सी सी 2 मध्ये लिलावद्वारे रेती उत्खननास परवानगी दिली आहे. लिलावातीत शर्तीप्रमाणे लिलाव ठेकेदाराने चिन्हांकित उपगटाच्या मर्यादेतच काम करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये एक ड्रेजर नियुक्त केलेला आहे. प्रत्यक्षात मात्र ठेकेदार एकापेक्षा अधिक ड्रेजरच्या साहायाने चिन्हांकित क्षेत्राबाहेर दिवसरात्र अनधिकृत उत्खनन करत असून संबंधित अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात केला आहे.
बी बी 2 हा उपगट बाणकोट खाडी ते शिपोळे उपगटासाठी मनोज इन्फ्राकॉन प्रा. लि न्हावशेवा ता. उरण या कंपनीसाठी वाळू उत्खननासाठी ठेका मंजूर असून उत्खनन उपगट सी सी 1 शिपोळे ते आढी दरम्यान अनधिकृत उत्खनन रात्रंदिवस चालू आहे. व शासनाचा कर बुडावण्याच काम सुरु आहे. आश्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्यावर फोजदारी कारवाईची मागणीदेखील निवेदनात केली आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी उत्खनन होत आहे. अशा ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.खाडीमार्गे वाहतूक करताना आंबेत ते म्हाप्रळ पुलाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठेकेदार उत्खनन केलेला वाळूसाठा किनार्यावर साठा करण्यासाठी किनार्यावरील कांदळवन कत्तल करून नाधिकृत प्लॉट तयार केले जात आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड यांनी ठरवून दिलेल्या खोलीपेक्षा जास्त खोल उत्खनन होत आहे. मात्र, याकडे शासकीय यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून खाडी लगत असलेल्या लोकवस्त्या यामुळे दिवसेंदिवस धोक्यात येत आहेत. या परिसरातील शेतीदेखील नष्ट होताना दिसत आहे. यावर येत्या आठ दिवसांत कोणतीही कारवाई न झाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी आपल्या निवेदनाद्वारे दिला आहे.