खात्यातून परस्पर काढले 6 लाख

0

पुणे । महिलेच्या खात्यातून बँकेच्या एजंटने कर्मचार्‍यांच्या संगनमताने तब्बल 6 लाख रुपये परस्पर काढून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ हा प्रकार कराड अर्बन सहकारी बँकेच्या कर्वे रोड शाखेमध्ये 3 एप्रिल 2012 ते जानेवारी 2017च्या दरम्यान घडला आहे़ बँक अधिकारी व बँकेचे पिग्मी एजंट यांनी त्याचा इन्कार केला असून पैसे काढताना त्या स्वत: हजर असल्याचा दावा केला आहे़

याप्रकरणी हेमलता भालेराव (52, रा़ कोथरूड) यांनी कोथरूड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ भालेराव यांचे पती दत्तात्रय चोरगे यांचे एप्रिल 2012 मध्ये निधन झाले़ भालेराव यांच्या बँकेच्या रिकरिंग खात्यात पैसे भरण्याचे काम एजंट गणेश शिंदे हा करीत असे़ त्याने बनावट स्वाक्षरी करून 22 जून 2012मध्ये त्यांच्या रिकरिंग खात्यातील 6 लाख 36 हजार 606 रुपये काढून ते बचत खात्यात वर्ग केले़ त्यानंतर 4 सप्टेंबर 2012 रोजी त्यांची खोटी स्वाक्षरी करून बचत खात्यातील 6 लाख 36 हजार 500 रुपये काढून फसवणूक केली असे फिर्यादीत म्हटले आहे़ या फिर्यादीवरून कोथरूड पोलिसांनी गणेश शिंदे (रा़ एरंडवणा) आणि कराड अर्बन सहकारी बँक कर्वे रोड शाखेतील कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे़ मात्र, बँकेचे अधिकारी व पिग्मी एजंट गणेश शिंदे यांनी याचा इन्कार केला असून पैसे काढण्याच्या वेळी त्या स्वत: हजर असल्याचा दावा केला आहे़ अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर जाखडे करीत आहेत.