पुणे । गाव आणि शहर यांच्यात एक दृढ व्यावसायिक संबंध प्रस्थापित होऊन त्याद्वारे ग्रामीण भागात बनणार्या वस्तू शहरी भागात विक्रीसाठी उपलब्ध होणे आणि त्याद्वारे रोजगार निर्मिती होणे आवश्यक असल्याचे मत खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केले.
विमाननगर येथील व्हीकफिल्ड चेंबरमधील केंद्रीय खादी व ग्रामीण आयोगाच्या मार्फत सुरू झालेल्या ‘खादी इंडिया’च्या पहिल्या विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना, आमदार जगदीश मुळीक, आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार आदी उपस्थित होते. देशातील प्रत्येक जिल्हात अशा प्रकारचे विक्री केंद्र उघडून खादीला सर्वदूर पोचविण्यासाठी आयोग कटिबद्ध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या पुढाकारमुळे खादीचा प्रचार आणि प्रसार देशभर होत असल्याचे नमूद करून सक्सेना म्हणाले, 2016-17मध्ये एकूण 2005 कोटी रुपयांची खादी विक्री झाली असून आगामी 5 वर्षांमध्ये 5000 कोटींच्या विक्रीचे उद्दिष्ट असून त्याद्वारे एकूण 20 लाख रोजगार निर्माण होणार आहेत.