खाद्यपदार्थांचे दर कमी न केल्यास तीव्र आंदोलन; मनसेचा मल्टिप्लेक्स मालकांना इशारा

0

पिंपरीः पिंपरी-चिंचवड शहरातील मल्टिप्लेक्स, चित्रपट गृहामध्ये अव्वाच्यासव्वा रुपये दराने खाद्य पदार्थांची विक्री केली जात आहे. मल्टिप्लेक्स चालकांनी येत्या आठ दिवसांत खाद्यपदार्थांचे दर कमी करावेत, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आले आहे. आठ दिवसात दर कमी न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकार्‍यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. तसेच मल्टिप्लेक्समध्ये पार्किंगदेखील मोफत करण्याची मागणी केली आहे. दर कमी न केल्यास उद्भवणार्‍या परिस्थितीला थिएटर मालक आणि पोलीस यंत्रणा जबाबदार राहील, असेही त्यांनी म्हटले आहे. महापालिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेला मनसेचे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले, राजू सावळे, बाळा दानवले, रुपेश पटेकर, संजय यादव, सीमा बेलापूरकर, अश्‍विनी बांगर, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, स्नेहल बांगर, सुजाता काटे, प्राजक्ता गुजर, आकाश पांचाळ आदी उपस्थित होते.

पदार्थांच्या दरांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे
नगरसेवक सचिन चिखले म्हणाले की, शहरातील अनेक चित्रपटगृहांमध्ये खाद्य पदार्थांची विक्री अव्वाच्या-सव्वा दराने केली जाते. यावर सरकार निर्बंध घालू शकत नाही का, असा सवाल देखील मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला होता. शहरातील चित्रपट गृहांमध्ये महाराष्ट्र चित्रपट कायदा 1953 महाराष्ट्र चित्रपट नियम 1966 अंतर्गत असलेल्या नियमांचे पालन केले जात नाही. या नियमाअंतर्गत खाद्य पदार्थांच्या दरांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. शहरातील चित्रपट गृहामध्ये प्रेक्षकांना त्यांच्या जवळील खाद्य पदार्थ प्रेक्षागृहामध्ये नेण्यास विरोध केला जातो, हे देखील अत्यंत चुकीचे आहे. येत्या आठ दिवसांत खाद्य पदार्थांचे दर कमी करावेत. तसेच त्याचबरोबर पार्किंगची देखील सेवा मोफत करावी. आठ दिवसात कारवाई न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.