खाद्यपदार्थ दुकाने, पानटपर्‍या, देशी दारूसह परमीट रूम ३१ मार्चपर्यंत बंद

2

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश : बँकांमध्येही चार ग्राहकांना तर बाजार समितीत १० जणांनाच प्रवेश

जळगाव – कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आली असुन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडून दैनंदीन आढावा घेतला जात आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री १० वाजेपासून जिल्ह्यातील देशी दारूसह सर्व परमीट रूम, पानटपर्‍या आणि उघड्यावरील सर्व खाद्यपदार्थाची दुकाने उद्या दि. २१ पासून दि. ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास परवाना रद्दची कारवाई करण्यात येणार आहे. वाईन शॉप मात्र या आदेशातुन वगळण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने हे आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या लक्षात घेता खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हास्तरावर रोज महत्वाचे निर्णय घेतले जात आहे. गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडुन आत्तापर्यंत लग्न, समारंभ, हॉल, सभागृह, मेळावे, आठवडे बाजार दि. ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. आज नव्याने काही महत्वाचे आदेश जारी करण्यात आले आहे.


पानटपर्‍यांसह उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रीवर बंदी
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. यात जिल्ह्यातील सर्व खाऊंची पाने, पानटपरी, तंबाखूजन्य पदार्थ, मावा, सुगंधी सुपारी व तत्सम खाण्याचे व चघळण्याचे पदार्थ विक्री करणारे सर्व दुकाने आणि रस्त्यावर/उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करण्यावर उद्या दि. २१ ते ३१ मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची असुन आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर भारतीय दंड संहिता १८६० (४५) चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र राहणार आहे.


मौजे कर्की व मौजे चोरवडे येथे चेकपोस्ट
जिल्ह्यात अनेक मोठ्या शहरातुन प्रवासी हे प्रवास करीत असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असते. या संसर्गाचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे कर्की व रावेर तालुक्यातील मौजे चोरवड येथे चेकपोस्ट तयार करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पथक कार्यान्वीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस अधीक्षकांनीही आवश्यक पोलीस कर्मचारी व पथकात वैद्यकीय अधिकार्‍यांचीही नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे.


बाजार समितीमध्येही प्रवेशावर मर्यादा
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येही ग्रामीण भागातून येणार्‍या शेतकर्‍यांची संख्या अधिक असते. त्यामुळे धान्य खरेदी वा विक्रीसाठी होणारी गर्दी टाळण्याकरीता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एखाद्या व्यवहारासाठी एकाच वेळेस १० पेक्षा अधिक लोकांना प्रवेश देऊ नये अशा सुचना आहेत. तसेच बाजार समितीतील व्यवहार हे टप्प्याटप्प्याने करण्यात यावे अशा सुचना करण्यात आल्या आहेत. या आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित बाजार समितीची राहणार असुन आदेशाचा भंग झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे.


बँकामध्ये एकावेळी चार ग्राहकांनाच प्रवेश
मार्च अखेरची धावपळ लक्षात घेता बँकांमध्ये मोठी गर्दी होते. याठिकाणचीही गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये एकावेळी चार ग्राहकांनाच प्रवेश देण्याचे आदेश आहेत. तसेच रोख भरणा व काढरे ही दोनच कामे प्राधान्याने बँकेने करावी, पासबुक भरणासाठी रांगेत उभ्या राहणार्‍या ग्राहकांमध्ये पाच फुट अंतर राहील अशी व्यवस्था करावी, ग्राहकांनी देखिल बँकेच्या काऊंटरपासून तीन ते पाच फुटाचे अंतर ठेवावे, सर्व ग्राहकांनी इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग, युपीआय, एटीएम, सीडीएम मशिन आदी सुविधांचा अधिकाधिक वापर करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे.


जिल्हास्तरीय समिती गठीत
कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाजया प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दररोज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी दालनात दैनंदिन आढावा घेणार आहे. यात समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहणार असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अथवा त्यांचे प्रतिनिधी हे सदस्य सचिव राहणार आहेत. या शिवाय जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता, मनपा आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अथवा या सर्वांचे प्रतिनिधी हे समिती सदस्य राहणार आहेत. दैनंदीन बैठकीला समितीतील सदस्य व सचिवांनी अद्यावत माहितीसह न चुकता बैठकीत उपस्थित राहण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत.