खाद्य पदार्थांच्या सुमार दर्जाला आयआरसीटीसी जबाबदार

0

नवी दिल्ली । रेल्वे प्रवासात रेल्वे कॅटरिंग सेवेच्या माध्यमातून देण्यात येणारे अन्न खाण्यालायक नसल्याची बाब कॅग अहवालात उघड झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली असून आपल्या कॅटरिंग पॉलिसीवर त्यांनी या निमित्ताने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. किचन सेटअपपासून ते हे किचन चालवण्यापर्यंत सगळी जबाबदारी आयआरसीटीसीची असल्याचे रेल्वे प्रशासनाने आपल्या ट्विटरवर म्हटले आहे. त्यामुळे या सगळ्या तक्रारींना केवळ रेल्वे प्रशासन जबाबदार नसून आयआरसीटीसीदेखील आहे.

27 फेब्रुवारीला तयार केलेल्या नवीन रेल्वे कॅटरिंग पॉलिसीचा हेतू हा प्रवाशांना चांगल्या दर्जाचे जेवण पुरवणे हाच आहे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याचसोबत आयआरसीटीसीने देखील जेवण बनविणे आणि ते वाढण्याच्या प्रक्रियेत हातभार लावावा, असे त्यांनी म्हटले आहे.

झोनल लेव्हलवर चालायचे काम
सर्व प्रकारच्या मोबाईल कॅटरिंग सर्व्हिसेसवर नजर ठेवण्याची जबाबदारी आयआरसीटीसीची आहे. आधी हे काम झोनल लेव्हलवर होत होते मात्र आता ते त्यांच्या अखत्यारीत नसून आयआरसीटीसीने देखरेख करणे आवश्यक आहे. रेल्वे फूड प्लाजा, फूड कोर्ट्स आणि फास्ट फूड युनिट्स यांची जबाबदारीदेखील आयआरसीटीसीची असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

रेल्वे प्रशासन विरोधात तक्रारी
रेल्वे परिसरात आणि ट्रेनमध्ये साफसफाई केली जात नाही. याखेरीज ट्रेनमध्ये विकल्या जाणार्‍या वस्तूंचा दर्जा अतिशय खालावलेला आहे. वस्तू खरेदीनंतर साधे बिलही दिले जात नाही. खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवणे, अन्नामध्ये उंदीर किंवा झुरळे सापडणे अशा अनेक गोष्टींचा समावेश कॅग अहवालात आहे. सोबतच रेल्वेच्या ट्रेनमध्ये पुरवल्या जाणार्‍या कॅटरिंग सेवेमध्ये मेन्यू कार्ड नसणे, खाद्यपदार्थांचं प्रमाण कमी असणे, ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीला खाद्यपदार्थ विकणे अशा अनेक समस्यांचा आढावा अहवालात घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वे आपल्या सेवेमध्ये बेस किचन, ऑटोमॅटिक वेंडिंग मशीन अशा प्राथमिक सुविधा देण्यात अपयशी ठरल्याचे कॅगने अधोरेखित केले आहे.