खानदेशच्या भाविकांसाठी सप्तशृंगगडावर ‘रोप वे’ची सुविधा

0

कळवण – खान्देशची माहेरवाशीन आणि साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून ख्याती असलेल्या सप्तशृंगगडनिवासीनी आई महिषासुरमर्दिनीचा नवरात्रोत्सव १० ते १८ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होत असून प्रथमच ‘रोपवे’च्या माध्यमातून २४ तास मंदिर परिसरात टप्प्या टप्प्याने भाविकांना सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रांताधिकारी प्रविण महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन बैठकीत कळवण तालुक्यातील सप्तश्रृंगी देवीचा दि.९ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या नवरात्रोत्सव व कोजागिरी उत्सवासाठी प्रशासकीय यंत्रणेने सज्ज राहण्यासाठी नियोजन करण्यात आले. धुळे,नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातून मोठ्याप्रमाणात देवीभक्त पायी गडावर येतात, यंदाही नवरात्रोत्सव काळात घाटरस्ता बंद राहणार आहे.तथापि,भाविकांची ने आण करण्यासाठी ६० एसटी बसेस नांदुरी ते गड धावतील तर ८० बसेस मालेगाव, नाशिक हुन नांदुरी पर्यंत सेवेत असतील.रोपवे च्या माध्यमातून तासाला १२०० ऐवजी ३०० अथवा ३६० भाविकांची ने आण करण्यात यावी जेणेकरून धक्का बुक्की होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

67 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची राहणार करडी नजर
मंदिर देवस्थान २४ तास खुले असणार आहे. देवी मंदिरातील दर्शन व्यवस्थेचे नियंत्रण दरवर्षीप्रमाणे मंदिर व्यवस्थापनाकडे राहील. रोपवेच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसरात टप्प्या टप्प्याने सोडण्याची जबाबदारी रोपवे प्रकल्पाची असून,तासाला अधिकतम पाच ते सहा ट्रीप चे नियोजन केले जाणार आहे. २३ व २४ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या कोजागिरी उत्सवकाळात कावड धारकांची अभिषेक व दर्शन प्रक्रिया संपेपर्यंत रोपवे सुविधा सर्वसामान्य भाविकांसाठी उपलब्ध नसेल. त्या दोन दिवसानंतर रोपवे सेवा पूर्ववत सुरू होईल.नवरात्रोत्सव काळात ६७ सीसीटीव्ही कॅमेरे गर्दीवर नजर ठेवून असतील. १२५ सिक्युरिटी गार्ड,५० आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक,१७५ अनिरुद्ध अकॅडमीचे आपत्ती व्यवस्थापन टिम, सप्तश्रृंगी देवस्थान ट्रस्टकडून ८०० कर्मचारी यात्राकाळात भाविकांच्या सेवेत असतील. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ६ कोटींचा जनसुरक्षा विमा काढण्यात येणार आहे.

नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन
भक्तनिवास व्यवस्था, शिवालय तीर्थावर हायमास्क उभारणी करीत प्रकाशव्यवस्थापन करण्यात येणार आहे. ध्वज मिरवणूक १७ ऑक्टोबर सायंकाळी ४ वाजता होईल. मोफत अन्नदान सुविधा सालाबादप्रमाणे असून, भाविकांच्या आग्रहाखातर सशुल्क व्हीआयपी भोजनकक्ष चालू करण्यात येणार आहे. त्यासाठी ५० अतिरिक्त कर्मचारी देवस्थान ट्रस्ट कडून सेवेत राहतील. प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला विशेष सूचना देण्यात आल्या. त्यात रस्ता दुरुस्ती करणे, रस्त्यावर दगड पडू नयेत म्हणून सुरक्षितता म्हणून प्रतिबंधक काळजी घेणे,आवश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर,दिशादर्शक फलक लावणे,कठडे व धोंड्या कोंड्याच्या विहिरीजवळ ची नाली बायपास करणे,गावंतर्गत भूमिगत गटारींसाठी रस्ते रिपेअर करणे यासारख्या सूचनाही देण्यात आल्या. नियोजन बैठकीच्या चर्चेत देवस्थान चे विश्वस्थ डॉ. रावसाहेब शिंदे, तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी डी.एम. बहिरम, ट्रस्ट व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, गड उपसरपंच राजेश गवळी यांनी सहभाग घेतला.