‘काव्यास्वाद’त प्राचार्य डॉ. किसन पाटील यांनी संपादित केलेला व अथर्व पब्लिकेशन्स ने प्रकाशित केलेला नवा काव्यसंग्रह संग्रह जरी उ. म. विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला मराठी अभ्यासकनासाठी तयार करण्यात आला असला तरी तो खानदेशातील पाच कवींच्या कसदार कवितांना समोर आणणारा व अभ्यासूंना उपयोगी पडणारा एक उत्तम संग्रह आहे. डॉ. किसन पाटील यांनी जे पाच कवी, अनुक्रमे अशोक सोनवणे, पांडुरंग सुतार, संजीवकुमार सोनवणे, चामुलाल राठवा व रावसाहेब कुवर निवडलेय व त्यांच्या ज्या प्रत्येकी सहा कविता घेतल्याचा त्यासंबंधी मनोगतात ते म्हणतात, “5 कवींची काव्यविषयक धारणा, काव्यनिर्मितीच्या प्रेरणा तसेच काव्यप्रयोजन लक्षात घेता हे सर्वच कवी ग्रामीण, दलित आणि आदिवासी जाणिवेतून कविता लिहिणारे आहेत, असे स्पष्ट होते. केवळ कवितेसाठी कविता न लिहिता, जीवनासाठी कविता असा कवितेकडे पाहण्याचा त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन या सर्वच कवितांतून सुस्पष्ट होतो. त्या दृष्टीने ही केवळ कव्यत्मक कविता नसून ही सामाजिक भूमिकेची आत्मनिष्ठेसह समष्टीनिष्ठेकडे जाणारी कविता आहे. असे प्रथमदर्शनी जणवते. म्हणूनच या सर्वच खानदेशातील कवींच्या काव्यगुणांचा, काव्यवेशिष्ट्यांचा परिचय नव्या पिढीला व्हावा या दृष्टीने हा समीक्षेचा प्रपंच निर्माण केला आहे.”
संग्रहाच्या पहिल्या प्रकरणात ‘मराठी कवितेची पार्श्वभूमी’ नामक लेख आहे जो महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या व साहित्याचा अभ्यास करणार्यांना खूप मोेलाचा आहे. तसेच खानदेशातील काव्यरत्नावली कार फडणीस यांनी कवितेला वाहिलेले मासिक चालवल्याने मराठी साहित्याचा किती नावाजलेले कवी दिले हेही विद्यार्थ्यांना कळते. दुसरा महत्वाचा भाग या संग्रहाचा सांगायचा तर, प्रत्येक कवीच्या ज्या निवडक कविता घेतल्याय त्यांची सुरेखशी पार्श्वभूमी आशयासह दिली आहे, जो प्रयोग खरंच स्तुत्य व विद्यार्थ्यांना वाचता, लिहिता करणारा आहे. अनेक अनुभव डोळसपणे घ्यावेत, त्यात कधी खोलवर तर कधी अलिप्तपणे रमावे, जमलं तर त्यातले खूपसे (दीर्घकाळापणे) मनात साठवावेत, त्यावर मनन-चिंतन करावे, अन् योग्य वातावरण मिळाले की ते सर्व अनुभव कागदावर कवितेच्या रुपात मांडावेत ही भूमिका घेत संग्रहातील सर्व कवींनी अगदी मनाला भिडणार्या, ‘वास्तव’ समोर ठेवणार्या, प्रसंगी आत्मकथनात्मक कविता लिहिण्यास डॉ. किसन पाटील म्हणतात त्याप्रमाणे ‘कवींची समाजाप्रति असलेली निष्ठा आणि कवितेच्या संवेदनशील जाणिवांमध्ये असलेली आत्मनिष्ठा या कवितांतून प्रत्ययास येते.’ संग्रहातील अशोक सोनवणे यांच्या ‘बाप’ फुंकर, गोवर्या वाटणी या कविता तसेच कवी सुतार यांच्या दुष्काळःएक आलेख, मी कबुल करतो की… त्याचप्रमाणे रावसाहेब कुवर यांच्या ‘माय काहीच बोलू शकलो नाही’ तग जगायला पाहिजे या कविता वाचल्यानंतर मनाच जी कालवाकालव होते ती स्वतःलाच घेतात पाडते, नव्हे जगण्याकडे बघण्याचं वेगळं धैर्यही देेते. एक गोष्ट खरी आहे की, आपण जे जगलो, जे अनुभवलं, आपल्याला जे समजलं, उमजलं ते सारं आपण दुसर्याचा आहे तस समजावून सांगू शकत नाही आणि त्याची तेवढी आवश्यकताही नाही. पण आपण जी माणसं, वाचली, जे वास्तव (जवळून) अनुभवल ते सारं आपण कविता, कथा वा इतर वाड्ःमय प्रकारातून मांडू शकतो, वाचकांसमोर ठेवत ‘अनुभव’ असं निश्चितच सांगू शकतो. संग्रहातील सर्व कवींनी आपल्या प्रत्येक कवितेमागे जो विचार मांडलाय, तो त्यांचा जरी असला तरी त्याचे (सत्य) स्वरुप वाचकांना उलगडणारे निश्चितच आहे, त्या कविता तोलून-मापून लिहिलेल्या नसून त्या ‘भावनाप्रधान’ आहेत. वास्तव जीवनाचा भावार्थ सांगणार्या या सर्व कविता खरंच कसदार आहेत!
– चंद्रकांत भंडारी,जळगाव
9890476538