अडीच लाखांच्या रोकडसह 40 मोबाईल व 20 दुचाकी जप्त
रावेर :- तालुक्यातील खानापूरपासून जवळच असलेल्या एका शेतात खुलेआमपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल व त्यांच्या पथकाने धाड टाकत 60 जुगारींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींच्या ताब्यातून अडीच लाखांपेक्षा अधिक रोकड जप्त करण्यात आली असून 40 मोबाईलसह 20 दुचाकी जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे स्थानिक पोलिसांना याची साधी भनकही लागू देण्यात आली नाही तर कारवाईनंतर तीन तासांना रावेर पोलिसांना कळवण्यात आले.
पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांनी सहाय्यक अधीक्षक नीलोत्पल यांना कारवाईचे आदेश दिले होते. भुसावळ येथील 26 कर्मचार्यांना घेऊन नीलोत्पल यांनी अत्यंत गोपनीय पद्धत्तीने दोन साध्या वाहनात जावून आरोपींना ताब्यात घेतले. अटकेतील 50 वर आरोपी हे बर्हाणपूर येथील रहिवासी आहेत. रात्री उशिरापर्यंत रावेर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.