कंटेनरचा कट लागल्याने तवेरा घाटात कोसळली ; आठ वर्हाडी गंभीर
विवरा बु.॥ ता रावेर : इंदौर येथून विवाहानंतर परतणार्या वर्हाडाच्या वाहनाला कंटेनरचा कट लागून झालेल्या अपघातात नवरदेवाची मावसबहिण जागीच ठार झाल्याची तर अन्य आठ वर्हाडी गंभीर जखमी झाले. अपघातात तवेरा मध्यप्रदेशातील कटीघाटात तब्बल 30 फूट खाली कोसळली. रविवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, अपघातात मयत झालेल्या आयेशाबी शेख रशीद (16) या तरुणीवर सोमवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कंटेनरचा कट लागल्याने अपघात
खानापूरचे रहिवासी शेख रशीद शेख रफिक यांचा मोठा मुलगा राजूचा विवाह इंदोरला रविवारी सकाळी 11 वाजता झाल्यानंतर सर्व वर्हाडी सायंकाळी परतीच्या प्रवासाला निघाले मात्र इंदोर-अमरावती महामार्गावरील कटी घाटात एका कंटेनरचा धक्का लागल्याने वर्हाडींची तवेरा 30 फूट खोल दरीत कोसळली. याचवेळी वर्हाडींची पाठीमागून येणारी वाहने थांबल्याने त्यांनी वर्हाडींना बाहेर काढण्यात मदत केली. या अपघातात नवरदेवाची मावसबहीण आयेशा शेख रशीद (16, रा.विवरे बु.॥) ही जागीच ठार झाली तर तिचे वडील शेख रशीद शेख छोटू व आई मेहमूनाबी शेख रशीद, तायराबी शेख गनी (रा.विवरे बु.॥) यांच्यासह सायराबी, पती शेख रफीक, तायराबी शेख गनी (दोन्ही रा.खानापूर, ता रावेर), शहनाज नदीमखान व फिरोजखान हैदरखान (रा.बिरोदा, ता.बर्हाणपूर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. चालक शालिग्राम दयाराम हा गंभीर जखमी असून त्याच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.
विवर्यात शोककळा
अपघातात मयत झालेल्या व नवरदेवाची नात्याने मावसबहिण असलेल्या आयेशाबी वर सोमवारी सकाळी शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, मोठी बहिण असा परीवार आहे.